"दक्षिणे'त कॉंग्रेसविरोधात सर्वपक्षीय मोट 

"दक्षिणे'त कॉंग्रेसविरोधात सर्वपक्षीय मोट 

कोल्हापूर - कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेसविरोधात सर्व पक्षांची मोट बांधणार आहे. सर्व पक्षांना सोबत घेत दक्षिणमधील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात येतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात येईल, असे सांगितले. 

आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही चंदगड विधानसभा मतदारसंघात काही ठिकाणी आघाडी करावी लागणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ही पत्रकार बैठक झाली. 

खासदार महाडिक म्हणाले, ""या वेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत बदलत्या स्थानिक राजकारणामुळे अनेक ठिकाणी आघाड्या होत आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या मतदारसंघात आपण सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय या सर्वांना एकत्र आणत दक्षिणमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात अन्य पक्षांशी चर्चा सुरू आहे. दक्षिणमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर किमान दोन उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहेत. अन्य पक्षांशी ज्या वेळी प्रत्यक्ष जागावाटपाची चर्चा सुरू होईल, त्या वेळी यात फरक पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दक्षिणमध्ये आपण कॉंग्रेसच्या विरोधात सर्वांना सोबत घेऊन लढणार आहे.'' 

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीस आजपासून सुरवात झाली आहे. जिल्ह्यात 50 गटांमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवार उभे करणार आहोत. त्यापैकी 40 जागांवर लक्ष केंद्रित करून त्या निवडून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या वेळी जिल्हा परिषदेवर निश्‍चितपणे राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल. मुलाखतींचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन दिवसांत आघाड्यांसंदर्भात अन्य पक्षांतील नेत्यांशी चर्चा सुरू करण्यात येईल.'' 

कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या मतावरच अवलंबून आहे. ज्या मतदारसंघातील कार्यकर्ते कॉंग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक असतील त्याच ठिकाणी आघाडी होईल. या वेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील आदी उपस्थित होते. 

चंदगडमध्ये भाजपबरोबर : संध्यादेवी कुपेकर 
या वेळी आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, ""चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता काही मतदारसंघांमध्ये आघाडी करावी लागणार आहे. आघाडी केली नाही तर राष्ट्रवादीचेच उमेदवार अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आम्ही या मतदारसंघात भारतीय जनता पक्षासोबत काही ठिकाणी आघाडी करत आहोत. आघाडी करत असताना पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे.'' 

आपणास माहित नाही.. 
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपण कॉंग्रेसच्या विरोधात सर्व पक्षांना एकत्र करुन उमेदवार उभे करणार असल्याचे सांगताच राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, याबाबत आपणास काही माहीत नाही.त्यांनी तशी वरिष्ट नेत्यांकडून परवानगी आणली असेल तर आपणास माहित नाही,सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com