आघाडीत मतभेद, राष्ट्रवादी काँग्रेस सैरभैर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

इस्लामपूर पालिकेत सत्ताधाऱ्यांतील गोंधळामुळे विकासाचा मुद्दा बाजूला पडण्याची चिन्हे
इस्लामपूर - शहरातील राजकारणात विकास आघाडीतील मतभेदाच्या चर्चेला उधाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस सैरभैर अशी अवस्था आहे. निवडणूक होऊन वर्ष होण्याआधीच गोंधळ सुरू झाल्याने शहर विकासाचा 
मुद्दा बाजूला पडण्याची चिन्हे आहेत.

इस्लामपूर पालिकेत सत्ताधाऱ्यांतील गोंधळामुळे विकासाचा मुद्दा बाजूला पडण्याची चिन्हे
इस्लामपूर - शहरातील राजकारणात विकास आघाडीतील मतभेदाच्या चर्चेला उधाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस सैरभैर अशी अवस्था आहे. निवडणूक होऊन वर्ष होण्याआधीच गोंधळ सुरू झाल्याने शहर विकासाचा 
मुद्दा बाजूला पडण्याची चिन्हे आहेत.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काठावर सत्तेत आलेल्या विकास आघाडीत ‘भाऊ बंदकी’च्या वादामुळे मतभेदाच्या चर्चेला उधाण आले. केंद्र-राज्यात सत्तेत भाजप असताना आणि शहरात भाजप-शिवसेना पुरस्कृत विकास आघाडी सत्तेत असताना ‘देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला’ अशी स्थिती निर्माण होऊ  नये, अशी चर्चा नागरिक करीत आहेत.
राष्ट्रवादीतून विकास आघाडीत येऊन नगराध्यक्ष झालेल्या निशिकांत भोसले-पाटील आणि भाजपचे नेते विक्रम पाटील यांच्यातील मतभेद शहरात उघडपणाने चर्चेत आहेत. 

एखाद्या कामाबाबत हे काम मीच केले असल्याचा आविर्भाव आणि त्यातून निर्माण होणारा श्रेयवाद ‘आघाडीत बिघाडी’ घडवून आणत आहे. सत्ता येताच निशिकांत पाटील-भोसले यांनी कामातून आगामी काळात विरोधक राष्ट्रवादीला कसा संघर्ष करावा लागणार आहे याची चुणूक दाखवून देत राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण केली होती. त्यातून राष्ट्रवादी अद्याप सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच राष्ट्रवादीतदेखील फूट पडत असल्याचे चित्र आहे. अटीतटीच्या सदस्यसंख्येत दादासाहेब पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली खरी, पण पाटील यांचीही घुसमट सुरू असल्याची भावना आहे. 

सत्ताधाऱ्यांना तोंड देण्यासाठी सतत त्यांनाच पुढे केले जाते आणि वैधानिक तरतुदींचे कारण पुढे करून सत्ताधारी गटाने उपनगराध्यक्ष खुर्ची व्यासपीठावरून बाजूला काढल्याने त्यांचीही निराशाच झाली.

राष्ट्रवादीतदेखील अंतर्गत मतभेद आहेत, पण विरोधक म्हणून भूमिका बजावताना किमान एकसंधता अपेक्षित आहे, जी अपवादाने पाहायला मिळते.

नगराध्यक्ष- माझ्यात मतभेद असल्याची अफवा आहे. ज्यांना चांगले चाललेले पाहवत नाही. शहर विकासात आडकाठी आणायची आहे अशांचा उद्योग सुरू आहे. उगाच वावड्या उठवून काहींना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
- विक्रम पाटील, प्रतोद, विकास आघाडी

सभागृहात सदस्यांनी वैयक्तिक मानापमान बाजूला  ठेवून शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. वैयक्तिक मतभेदांचा परिणाम कामकाजावर होणार नाही, यासाठी दोन्ही गटांनी प्रयत्न करावेत.
- संजय कोरे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: aghadi disturbance ncp confuse