अब की बार...आघाड्याच फार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सांगली - जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडीचा सूर आळवला जाण्याच्या शक्‍यता वाढताना दिसत आहेत.

वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, शिराळा तालुक्‍यांत राष्ट्रवादीची तर कडेगाव, पलूस, मिरज, जत, खानापूर तालुक्‍यात काँग्रेसची ताकद आहे. त्यांचा सूर जुळला तरच भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते, याची कल्पना दोन्ही पक्षांतील नेत्यांना आहे. त्यामुळे भाजपकडूनही शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. ‘अब की बार... आघाड्याच फार’, अशीच य निवडणुकीत स्थिती राहू शकते.

सांगली - जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडीचा सूर आळवला जाण्याच्या शक्‍यता वाढताना दिसत आहेत.

वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, शिराळा तालुक्‍यांत राष्ट्रवादीची तर कडेगाव, पलूस, मिरज, जत, खानापूर तालुक्‍यात काँग्रेसची ताकद आहे. त्यांचा सूर जुळला तरच भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते, याची कल्पना दोन्ही पक्षांतील नेत्यांना आहे. त्यामुळे भाजपकडूनही शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. ‘अब की बार... आघाड्याच फार’, अशीच य निवडणुकीत स्थिती राहू शकते.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर चारही प्रमुख पक्षातील नेत्यांनी बाहूवरच्या बेंडकुळ्या दाखवून ‘झेंडा आमचाच’, अशी गर्जना केली आहे. पहिल्या टप्प्यात स्वबळाची भाषा होतेच, मात्र गेल्या तीन वर्षात वारे खूप बदलले आहे. त्याचा आदमास बड्या नेत्यांना आला आहे. त्यामुळे चिन्हांचा आग्रह बाजूला ठेवून शक्‍य तिथे आघाड्यांचे वारे घुमू लागले आहे. भाजपची भिस्त केवळ लाटेवर नाही, आमचीही ताकद आहे, हे नेत्यांना सिद्धच करावे लागणार आहे.

त्यांच्यासमोर मुख्य स्पर्धक काँग्रेस असणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीची सध्या तरी पीछेहाट झाल्याची दिसतेय. जिल्हाभर खेळ मांडण्यात माहीर असलेल्या जयंतरावांना यावेळी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. त्यात ‘नो जेजेपी, ओन्ली बीजेपी’ हा खासदार संजय पाटील यांचा नारा नव्या डावाची मांडणी दर्शवणारा आहे. भाजपला सत्तेजवळ जायचे असेल तर पूर्णपणे जयंतरावांना सोबत घ्यावे लागेल किंवा पूर्णपणे बाजूला ठेवावे लागेल; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, रासपसारखे अनेक मतदारसंघात निर्णायक असणारे घटक दुरावू शकतात.

ही निवडणूक उघड लढाईची असणार नाही, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. छुप्या आघाड्या होणार आहेत. त्या कशा आकार घेतात, याकडेच लक्ष असेल. आमदार पतंगराव कदम यांनी सांगली बाजार समिती पॅटर्नची चर्चा चालवली आहे. खासदार शेट्टी यांनी शिराळा-वाळव्यात इस्लामपूर पॅटर्न, तर अन्यत्र सांगली बाजार समिती पॅटर्नचे संकेत दिलेत. खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सदाभाऊ खोत यांना बांधून घेताना स्वाभिमानीची ताकद आमच्यासोबत असेल, असा नारा दिला आहे. जयंतरावांनी भाजपचा हुकमी नेता फोडण्यात यश मिळवले, असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आबा गटाला कवठेमहांकाळ, मिरज पूर्वमध्ये ताकद मिळू शकेल. कवठ्यात तर भाजप व काँग्रेसची आघाडी होण्याची चिन्हे दाटली आहेत. पलूस, कडेगावमध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, आटपाडी; खानापुरात शिवसेनेविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी; जतमध्ये भाजप, जनसुराज्यसह स्थानिक विकास आघाडी होऊ शकेल, अशी चिन्हे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्‍चर्य नको. 

तासगावात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात सामन्यात काँग्रेस पुन्हा ‘वजाबाकी’ पुरती राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार का? मिरज तालुक्‍यात काँग्रेसची ताकद विभागू नये यासाठी माजी मंत्री मदन पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील एकत्र आलेत. ‘सत्तेसाठी शहाणपण’ घेतल्याचे चित्र सध्या तरी दिसतेय. कदम गटाशी ते जुळवून घेतात का, एवढेच पाहणे बाकी आहे. शिराळ्यात काँग्रेसचे सत्यजित देशमुख, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक ही आघाडी निश्‍चित आहे. तेथे भाजप, स्वाभिमानीची गट्टी जमेल, असे शिवाजीराव नाईक, शेट्टींनी आधीच स्पष्ट केले आहे. 
 
तालुकानिहाय जि. प. गट व पं. स. गण
मिरज- ११ व २२,
वाळवा-११ व २२,
जत- ९ व १८,
खानापूर- ३ व ६.
पलूस- ४ व ८, 
शिराळा- ४ व ८,
कवठेमहांकाळ- ४ व ८,
कडेगाव- ४ व ८,
आटपाडी- ४ व ८,
तासगाव- ६ व १२
एकूण जागा ६० व १२०

या सर्व जागांसाठी १ ते ६ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर कमळ फुलणार हे नक्की. काही दिवसांत त्याची तयारी केली आहे. ‘ओन्ली बीजेपी’ चा दिलेला नारा निकालातून दिसेल. आम्ही अंदाज घेऊन मताधिक्‍य मिळणाऱ्या व काठावरील जागांवर लक्ष केंद्रित करणार आहे. वाळवा तालुक्‍यात आघाडीसोबत असू.
- संजय पाटील, खासदार, भाजप. 

स्वाभिमानीच्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीत घेणार आहे. कोणाबरोबर जायचे हे अद्याप ठरलेले नाही. तरी मिरज पश्‍चिम, वाळवा, शिराळ्यासह तासगाव, कवठेमहांकाळमध्ये अनेक ठिकाणी निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकद आमच्यात आहे. स्थानिक परिस्थितीनुसार वेगळी भूमिका राहिल.
- राजू शेट्टी, खासदार व स्वाभिमानीचे नेते

झेडपीचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल. निवडणुक पूर्व आणि नंतरही समविचारी पक्षांशी आघाडी होऊ शकेल. या निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी आम्ही सर्वेक्षण करणार नाही. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच रिंगणात उतरवले जाईल. राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरेल. राज्यातील सत्ताधाऱ्यांवरील नाराजीचा फायदा होईल.
- जयंत पाटील, आमदार व राष्ट्रवादीचे नेते

विधान परिषद निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांकडून फसवणूक झाल्याची भावना जनतेत रुजली आहे. बहुतांश लोकांना काँग्रेसला जवळ केले आहे. विधान परिषद निवडणुकीत ते सिद्धही झाले. आता झेडपी, पंचायत समितीत ते सिद्ध होईल. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. बाजार समितीत स्वाभिमानी आमच्यासमवेत आहे. त्याचाही विचार करू. जिल्ह्यातून राष्ट्रवादी हद्दपार होईल, निवडणुकीनंतर भाजपची सूज कमी झालेली दिसेल.’
- पतंगराव कदम, आमदार, काँग्रेसचे नेते

शिवसेना स्वतंत्रच लढेल. माझ्या विधानसभा मतदारसंघात तरी पूर्ण तयारी केली आहे. सध्या तरी युती-आघाडीबाबत चर्चा नाही. संपूर्ण जिल्ह्यातील निवडणुकीबाबत जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुखांचा निर्णय अंतिम असेल. परस्थिती पाहून ऐनवेळीही निर्णय घेतला जाऊ शकतो.
- अनिल बाबर, आमदार व शिवसेना नेते.

Web Title: aghadi in zp election sangli