भाजपमध्ये जाणाऱ्या पिचड यांच्या विरोधात भाजपचे जनआक्रोश आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मधुकर पिचड यांच्या दुसऱ्या पत्नी व आमदार वैभव पिचड यांच्या सावत्र मातु:श्री कमल देशमुख-पिचड या मराठा समाजाच्या आहेत. परंतु पिचड यांनी मंत्रीपद व राजकीय शक्तीचा वापर करून त्या आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळविला. त्यातून त्यांनी गरीब असलेल्या आदिवासी समाजाची लूट केली आहे.

अकोले : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात राहून मंत्रीपदाचा उपभोग घेतलेल्या माजीमंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात उद्या (ता. 30) अकोले येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजप नेते अशोक भांगरे यांनी सांगितले. सकाळी नऊ वाजत अकोले शहरातील बाजारतळावर आंदोलनास प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

मधुकर पिचड यांच्या दुसऱ्या पत्नी व आमदार वैभव पिचड यांच्या सावत्र मातु:श्री कमल देशमुख-पिचड या मराठा समाजाच्या आहेत. परंतु पिचड यांनी मंत्रीपद व राजकीय शक्तीचा वापर करून त्या आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळविला. त्यातून त्यांनी गरीब असलेल्या आदिवासी समाजाची लूट केली आहे. त्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यातून आदिवासींना फसविल्याबद्दल पिचड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते भांगरे यांनी केली आहे. 

माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मंत्रीपदाच्या काळात बिगर आदिवासी असलेल्या आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे आदिवासी असल्याबाबत खोटा दाखला मिळविला. त्याचा वापर करुन पिचड यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता देखील बळकावली असल्याचा आरोप भांगरे यांनी केला आहे. याचा निषेध म्हणून अकोले येथील आदिवासी कृती समितीद्वारे अकोले शहरात पिचड यांच्या बिगर आदिवासी पत्नीकडे असलेल्या दाखल्यांच्या प्रतींचे वाटप केले जाणार असल्याचे भांगरे म्हणाले. आदिवासी कृती समितीतर्फे त्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले असून, समितीचे सदस्य व समाजातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against NCP leader Madhukar Pichar in Nagar