
भाजी विक्रेते आणि रेशन धान्य दुकानदारांच्या विनंतीला मान देवून शेतकऱ्यांनीच दोन दिवसात हा खेळखंडोबा थांबवा, असे आवाहन करत मुख्य रस्त्यावर उभी केलेली गुळाची वाहने बाजुला करत चक्काजाम आंदोलन मागे घेतले.
कोल्हापूर - दहा टक्के हमाली वाढ द्यावी या मागणीसाठी व्यापारी आणि हमालांनी मनमानीपणे सौदे बंद केले. विनंती आणि आवाहन करूनही सौदे सुरू केले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत येणारे आणि जाणारे सर्व रस्ते बंद करून चक्का जाम केला.
सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत हजारो वाहने बाजार समितीतच्या आवारत उभी करून ठेवावी लागली. तरीही, व्यापारी आणि हमालांमधला हमाली वाढीचा घोळ संपता संपेना, दोघांमध्येही हमरी - तुमरी, शेवटी भाजी विक्रेते आणि रेशन धान्य दुकानदारांच्या विनंतीला मान देवून शेतकऱ्यांनीच दोन दिवसात हा खेळखंडोबा थांबवा, असे आवाहन करत मुख्य रस्त्यावर उभी केलेली गुळाची वाहने बाजुला करत चक्काजाम आंदोलन मागे घेतले.
हमाल दरवाढीवरुन सौदे बंद
हमाली किती आणि कशी वाढवायची याबाबत बाजार समिती, व्यापारी आणि हमालांमध्ये मतभेद आहेत. वारंवार या ना त्या कारणाने व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वादाची ठिणगी पडते. आज हमाली वाढीवरून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले. पहाटे चारला आलेल्या खरेदीदार व माथाडी कामगारांच्यात हमाल दरवाढीवरुन सौदे बंद पडले. सौदे बंद पाडून आमचे नुकसान का करता असा संतप्त सवाल करीत सोमवारी(ता.18) गुळ उत्पादकांनी बाजारसमितीचे सर्व दरवाजे बंद करुन वाहतूक रोखली. चारही दरवाजामध्ये अडकलेली शेकडो वाहने, गुळ उत्पादकांचे ठिय्या आंदोलन यामुळे बाजारसमिती आवार अस्वस्थ बनले.
पाडव्यापर्यंत दहा टक्के वाढ
बाजारसमितीच्या वतीने आम्ही व्यापारी व माथाडी कामगारांना समन्वयातून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांचे यापुढे नुकसान झाले तर बाजारसमिती प्रशासन सहन करणार नाही. तूर्त तरी पाडव्यापर्यत दहा टक्के वाढ देण्याबाबत आम्ही व्यापाऱ्यांना पत्र दिले आहे.
- मोहन सालपे, सचिव, कोल्हापूर बाजारसमिती
किरकोळ व्यापाऱ्यासह वाहतूकदारांची गैरसोय
बाजारसमितीच्या पुढाकाराने खरेदीदार, माथाडी कामगारांच्या चार ते पाच सुरु असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतरही दुपारपर्यंत यातून तोडगा निघू शकला नाही. पोलिसांनी संबधितांची एकत्रित बैठक घेत अगोदर वाहतूक सुरळीत करा, नंतर चर्चा करा असे सुनावल्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान वाहतूक सुरळीत झाली. या दरम्यान बाजारसमितीचे सर्वच विभाग अक्षरश: वेठीस धरले गेले. शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन व लवकर तोडगा निघत नसल्याने किरकोळ व्यापाऱ्यासह वाहतूकदार व अन्य घटकांची मोठी गैरसोय झाली.
तीन वर्षे वाढ न देणे अमान्य
गेल्या काही दिवसांपासून माथाडी कामगार व गुळ व्यापाऱ्यांत हमाल दरवाढीवरुन संघर्ष सुरु आहे. यातून तोडगा म्हणून बाजारसमितीच्या मध्यस्तीने व्यापाऱ्यांनी दहा टक्के दरवाढ द्यावी आणि पुन्हा तीन वर्षे माथाडी कामगारांनी वाढ मागू नये असे पत्र देवून सौदे सुरु करण्याबाबत आवाहन केले होते. पण हा निर्णय माथाडी कामगारांना मान्य नव्हता. पुढील तीन वर्षे वाढ नाही ही अट काढावी म्हणून त्यांनी मागणी केली. परंतू व्यापाऱ्यांनी मात्र या अटीवरच वाढ देत असल्याचे सांगत ताठर भूमिका घेतली. या त्रांगड्याचे पर्यावसान सोमवारी (ता.18) गुळ सौदे बंद होण्यावर झाले.
साैदे बंद पाडल्यास तीव्र आंदोलन
व्यापारी व माथाडी कामगाऱ्यांमध्ये वादात आमचे नुकसान करु नये. अगोदरच पुरामुळे आम्ही उध्वस्त झालो आहोत. असे असूनही या घटकांकडून आमची मुस्कटदाबी सहन करणार नाही. जर पुन्हा यांनी सौदे बंद केले तर आंदोलन आणखी तीव्र करु
- भगवान काटे, शेतकरी प्रतिनिधी