नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे मोहोळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

राजकुमार शहा 
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुले पळविणारी टोळी समजुन पाच जणांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील या समाजाच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

मोहोळ - राईनपाडा ता. साक्री येथे 1 जुलै ला नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मुले पळविणारी टोळी समजुन पाच जणांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील या समाजाच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

राईनपाडा येथील आठवडा बाजारात भारत भोसले दादा भोसले भारत माळवे आप्पासो इंगोले राजेंद्र भोसले हे त्यांच्या कामासाठी बाजारात आले असता यांना मुले पळविणारी टोळी समजुन त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडुन बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांची कुटुंबे उघडयावर पडली आहेत. त्यांच्या ओळखीचे पुरावे दाखवुन देखील त्यांची जाणुन बुजुन हत्या करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष काका देशमुख माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे भिम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. विनोद कांबळे पिंटु शेगर यांनी घटनेच्या निषेधार्थ मनोगते व्यक्त केली. 

आंदोलकानी या केल्या मागण्या -

  • समाजातील नागरीकांची हत्या केलेल्याना फाशी द्यावी.
  • राईनपाडा गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील तंटामुक्त अध्यक्ष यांचा गुन्ह्यात समावेश करून त्यांनाही फाशी द्यावी. 
  • या खटल्या कामी वकील म्हणुन उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
  • खटला जलदगती न्यायालयात चालवावा. 
  • या संपूर्ण घटनेची चौकशी एसआय टी मार्फत व्हावी. 
  • मृत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी पंचवीस लाखाची मदत मिळावी. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. 
  • मृत कुटुंबातील एक व्यक्ती शासन सेवेत सामावुन घ्यावे. 
  • समाजाला भिक्षा मागताना संरक्षण मिळावे.

या मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात भाऊराव शिंदे, अंकुश चव्हाण, सुभाष इंगोले, सुरेश चव्हाण, मोहन चव्हाण, तुकाराम शेगर, अर्जुन चव्हाण, दादाहरी चव्हाण, राहुल शेगर, दता बाबर, रत्नाकर साळुंखे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. निवेदन महसुल नायब तहसीलदार जिवन क्षीरसागर व पोलिस उपनिरीक्षक थेटे यांनी स्विकारले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Agitation of nathpanthi davri gosavi at mohol taluka