येरळा नदीवर नवा पुल बांधावा यासाठी अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

खानापूर व कडेगांव तालुका हद्दीत रामापूर - कमळापूर गावांना जोडणारा येरळानदीवर पूल आहे. या पूलावरून दोन्ही गावचे लोक व शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अवकाळी पावसाने पूलाची दुरवस्था झाली आहे.

विटा ( सांगली ) :  रामापूर - कमळापूर येरळा नदीवरील निकामी झालेला जुना पूल काढून त्याठिकाणी नवीन पूल बांधावा, या मागणीसाठी रामापूर, कमळापूर गावातील ग्रामस्थांनी विटा तहसील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. मागण्याचे निवेदन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना देण्यात आले. दरम्यान, मोर्चातील तरूणांनी रक्तदान करून शासनाचा निषेध व्यक्त केला. अॅड. दीपक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. 

हेही वाचा - उसाबाबतची ही गोष्टी राजू शेट्टी यांना अमान्य 

खानापूर व कडेगांव तालुका हद्दीत रामापूर - कमळापूर गावांना जोडणारा येरळानदीवर पूल आहे. या पूलावरून दोन्ही गावचे लोक व शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अवकाळी पावसाने पूलाची दुरवस्था झाली आहे. त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. रामापूर येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांना नजीकच्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरून जावे लागत आहे. पूल धोकादायक झाल्याने गाड्यांची वाहतूक व लोकांचे ये - जाणे बंद केले आहे. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. तातडीने याठिकाणी नवीन पूल बांधून द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - लाकडी कपाट अंगावर पडले अन् घडला हा अनर्थ 

तात्पुर्ती डागडुजी नको, नवा पुलच हवा

दरम्यान, तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांनी पूलाची तात्पुर्ती डागडुजी न करता नवीन पूलच बांधून द्यावा, असा पवित्रा घेतला. त्यावर तहसीलदार श्री. शेळके व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एम. डी. बंडगर यांनी सध्या दहा लाख रुपये पूलाच्या दुरूस्तीसाठी मंजूर आहेत. त्यातून पूलाची डागडुजी केली जाईल. नवीन पुलासाठी मी वरिष्ठांना पत्रव्यवहार करतो, असे आश्वासन तहसीलदार श्री. शेळके यांनी ग्रामस्थांना दिले.  या मोर्चात जयकर साळुंखे, दशरथ साळुंखे, अधिक शिंदे, सुरेश शिंदे, तानाजी गायकवाड, जगन्नाथ शिंदे, शरद यादव, अर्जुन यादव, दीपक गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation For New Bridge On Yerala River