शाहू मिलच्या जागेत 'हे' विद्यापीठ व्हावे यासाठी जल आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती. पोलिस प्रशासन गैरहजर होते. आपत्कालीन यंत्रणेच्या माध्यमातून पंचगंगा नदीवर अग्निशमन गाडीसह ८ कर्मचारी तैनात होते.

इचलकरंजी ( कोल्हापूर ) - कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागेत छत्रपती शाहू महाराज पोलिस ॲकॅडमी विद्यापीठ व्हावे आणि मातंग वसाहतीकडील बाजूस शाहू स्मारक व्हावे, या मागणीसाठी पंचगंगा नदीपात्रात जल आंदोलन केले. ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शन यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत पोलिस ॲकॅडमी विद्यापीठाची मागणी केली.

गुजरातमधील कराई येथे पोलिस ॲकॅडमी विद्यापीठ आहे. त्या धर्तीवर देशातील दुसरे पोलिस ॲकॅडमी विद्यापीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी जलआंदोलनाचा लढा उभारला आहे. आर्मी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या पदांसाठी प्रशिक्षण व नोकरी संदर्भात माहिती केंद्र या ठिकाणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस विद्यापीठ शाहू मिलच्या जागेत उभारले जाणार नाही, तोपर्यंत सर्व ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारला जाईल, असे आप्पासाहेब कोकितकर यांनी सांगितले. पंचगंगा काठावर जोरदार घोषणाबाजी करत नदीपात्रात जाऊन आंदोलन केले. आय. जे. इचलकरंजीकर, माणिक भंडारे, हमीद पन्हाळकर, विनोद पवार, सचिन बाबर, अंजू मुल्ला, संजय देवकर, अमित गडकरी, उमेश देसाई, सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात.. 

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

जल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती. पोलिस प्रशासन गैरहजर होते. आपत्कालीन यंत्रणेच्या माध्यमातून पंचगंगा नदीवर अग्निशमन गाडीसह ८ कर्मचारी तैनात होते. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी पात्रात आंदोलनकर्त्यांना कोणताही धोका उद्‌भवू नये, याची काळजी घेत सर्वांना पात्रातून सुरक्षित बाहेर काढले.

हेही वाचा - बापरे ! कागल - निढोरी मार्गावर बिबट्याचे दर्शन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation For Police Akadami University On Shahu Mill Land