राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरात हल्लाबोल आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर - केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 6 व 7 एप्रिल या दोन दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. 

विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते. शुक्रवारी (ता. 6) महूद येथे सकाळी 11 वाजता, मोहोळमध्ये दुपारी चार वाजता आणि सोलापुरातील नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता या मान्यवरांच्या सभा होणार आहेत. शनिवारी (ता. 7) टेंभुर्णी येथे सकाळी 11 वाजता, वैराग येथे सायंकाळी 5 वाजता आणि कुर्डुवाडी येथे रात्री आठ वाजता हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभा होणार आहेत. 

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतक-यांच्या कृषी पंपाची वीज बिले तात्काळ माफ करावी, जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार व नोकऱ्या देण्याच्या सरकारच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये अशांतता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित असून त्यांना शिक्षण शिक्षण घेताना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. नोटबंदीमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील पैसे स्वीकारण्यात न आल्यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली असून सर्वसामान्यांच्या मनामध्ये सरकार विषयीची विश्व्सार्हता संपली आहे. सरकारने फसव्या व खोट्या जाहिरातींवरील वारेमाफ खर्च थांबवून हा पैसे विकास कामांसाठी उपयोगात आणावा या मागण्यांकडे या आंदोलनात लक्ष वेधणार असल्याचे श्री. साळुंके-पाटील यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी
    क्लिक करा. 
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा. 
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

 

Web Title: Agitation in Solapur by National Congress Party