कृषी, उद्योग विकासाचे ठरतायत केंद्रबिंदू

दिलीप कोळी
मंगळवार, 24 जुलै 2018

ताकारी, टेंभूचे वरदान : टोमॅटो, द्राक्षांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता     
विटा - खानापूर तालुक्‍यात एकीकडे दुष्काळी पट्टा व दुसऱ्या बाजूला सधन भाग आहे. दोन्ही बाजू वेगवेगळ्या असल्या तरी कृषी, उद्योग, सहकार, पोल्ट्री, बॅंका, शिक्षण संस्था, साखर कारखाना, दूध संघ, गलाई व्यवसाय विकासाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. द्राक्ष, टोमॅटो व भाजीपाल्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता मिळत आहे.

ताकारी, टेंभूचे वरदान : टोमॅटो, द्राक्षांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता     
विटा - खानापूर तालुक्‍यात एकीकडे दुष्काळी पट्टा व दुसऱ्या बाजूला सधन भाग आहे. दोन्ही बाजू वेगवेगळ्या असल्या तरी कृषी, उद्योग, सहकार, पोल्ट्री, बॅंका, शिक्षण संस्था, साखर कारखाना, दूध संघ, गलाई व्यवसाय विकासाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. द्राक्ष, टोमॅटो व भाजीपाल्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता मिळत आहे.

तालुक्‍यात ताकारी, आरफळ व टेंभूचे पाणी शेतीला मिळत असल्याने बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. उसाबरोबर निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, टोमॅटो, केळी आदी पिके शेतकरी घेत आहेत. निर्यातक्षम द्राक्षे परदेशांत पाठविली जातात. तर भाजीपाला, टोमॅटो, ढोबळी मिरची तरकारी केली जाते. शेतकरी ऊस तालुक्‍यातील उदगिरी तसेच तालुक्‍याच्या नजीकच असलेल्या सोनहिरा, क्रांती साखर कारखान्यांना पाठवितात. शेतकऱ्यांचा कणा असलेल्या सोसायट्या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात आहेत.

सोसायट्यातून शेती, जनावरे, शेळ्यांसाठी कर्ज मिळत असल्याने दुग्ध व्यवसायही वाढत आहे.  

तालुक्‍याबरोबर विटा शहरातही मोठे बदल होऊ लागले आहेत. सांगली -भिगवण व विजापूर- गुहागर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये उभारली गेलीत. त्यामुळे लग्नकार्याची लोकांची सोय झाली आहे. त्यातून लग्नसराईत मोठी उलाढाल होत आहे. शहरात विविध बॅंकांचे जाळे वाढू लागले आहे. शहरात सर्व प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यामुळे शहराचा विस्तार होऊन या बदलत्या सोयीसुविधामुळे विकासाला चालना मिळू लागली आहे. खानापूर व कडेगाव तालुक्‍यासाठी विटा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यामुळे जनावरे खरेदी-विक्री, भाजीपाला यातून शेतकरी समृद्ध होत आहेत. वाढत्या शहराच्या विस्तारामुळे जागांचे दरही गगनाला भिडले आहेत. सांगली- विटा, मायणी रस्ता, नेवरी रस्ता, साळसिंगे, वेजेगाव, कऱ्हाड रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात प्लॉट पाडण्यात आले आहेत. जागांना मागणी वाढू लागली आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा पोल्ट्री व यंत्रमाग व्यवसाय शहर व तालुक्‍यात आहे. सांगली- विटा रस्त्यावर औद्योगिक वसाहत आहे. तेथेही काही प्रमाणात उद्योग सुरू आहेत.

जागांचे दर गगनाला 
विटा शहराचा वाढत्या विस्तारामुळे जागांचे दर गगनाला भिडले आहेत. सांगली रस्ता, कऱ्हाड, मायणी रस्त्याकडेला असलेल्या जागांना मोठी मागणी आहे; परंतु प्लॉटधारकांकडून अवाच्या सव्वा दर सांगितले जात असल्याने खरेदी- विक्री कमी प्रमाणात आहे. 

तालुक्‍यातील सहकारी संस्था 
सोसायट्या -५४, पतसंस्था -४३, नोकरसंस्था-७,  खरेदी- विक्री संघ-२, मजूर संस्था -१८, साखर कारखाना- १, गृहनिर्माण संस्था-२, वस्त्रोद्योग-८, दूध संघ- ३, औद्योगिक संस्था १, सहकारी बॅंक-३.

Web Title: agriculture business development