शेती थकबाकीची जूननंतर वसुली 

तात्या लांडगे
सोमवार, 22 एप्रिल 2019

कर्जमाफीच्या एकरकमी परतफेड योजनेची (ओटीएस) मुदत जूनमध्ये संपल्यानंतर बॅंकांनी थकबाकी वसुली करावी, असे निर्देश सरकारने दिल्याने ऐन दुष्काळात बळिराजाची चिंता वाढली आहे. 

सोलापूर - राज्यातील जिल्हा बॅंकांचे शेती व बिगरशेती कर्जाचे तब्बल 43 हजार कोटी रुपये थकले आहेत, त्यामुळे राज्यातील 16 जिल्हा बॅंकांची थकीत कर्जे (एनपीए) मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याची माहिती नागरी बॅंक्‍स असोसिएशनच्या मुंबईतील सूत्रांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर आता कर्जमाफीच्या एकरकमी परतफेड योजनेची (ओटीएस) मुदत जूनमध्ये संपल्यानंतर बॅंकांनी थकबाकी वसुली करावी, असे निर्देश सरकारने दिल्याने ऐन दुष्काळात बळिराजाची चिंता वाढली आहे. 

राज्यात मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. कर्जमाफीच्या विलंबामुळे बॅंक खाते थकबाकीत गेल्याने नव्याने कर्ज मिळेना. दुष्काळाची मदत नाही, पाणीपातळी खोलवर गेली, चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत, यांसारख्या अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. या परिस्थितीत राज्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत आहे. दुसरीकडे तब्बल 161 साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उसाची योग्य आणि किफायतशीर दराची (एफआरपी) पूर्ण रक्‍कम दिली नसल्याचे साखर संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

यंदाच्या हंगामात 195 साखर कारखान्यांनी 940 लाख टन उसाचे गाळप केले; परंतु साखरेला बाजारात मागणी नसल्याने कारखाने अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. अशी परिस्थिती असतानाही सरकारने थकबाकी वसुलीचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांना आताच संकटाचे ढग दिसू लागले आहेत. 

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र, दुष्काळ पडल्याने शेतीकर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे बॅंकांच्या थकबाकीत वाढ झाली आणि बॅंकांसमोर अडचणींचा डोंगर उभारला. कर्जमाफीतील एकरकमी परतफेड योजनेची (ओटीएस) मुदत मार्चऐवजी आता जूनपर्यंत वाढविली आहे. त्यानंतर संबंधित थकबाकी वसुली होईल. 
- किसन मोटे, सरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर 
 

राज्याची सद्यःस्थिती 
एकूण जिल्हा बॅंका  - 31 
शेती-बिगरशेतीची थकबाकी  - 43 हजार 798.21 कोटी 
अडचणीतील जिल्हा बॅंका  - 16 

Web Title: Agriculture dues recovery after June