राष्ट्रीयीकृत बॅंकांची अनास्था

विशाल पाटील
शुक्रवार, 19 जुलै 2019

इशारा नको, दणका द्या!
राज्यभरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीक कर्ज देण्याबाबत सुरू असलेली हयगय सातारा जिल्ह्यातही कायम आहे. जिल्हाधिकारी केवळ कारवाईची भाषा बोलतात, त्यातून कर्जवितरणाचे प्रमाण वाढते. मात्र, हे शेवटच्या टप्प्यात होत असते. परिणामी, वर्षानुवर्षे बॅंकांचा उदामपणा सुरूच राहतो. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केवळ इशारा नको, तर थेट दणकाही द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्‍त करत आहेत.

जिल्ह्यात अवघे १५ टक्‍के कर्जवाटप; ‘डीसीसी’चे १०४८ कोटी कर्ज वितरण
सातारा - शेतकऱ्यांना खरीप हंगामात मिळणारे पीक कर्ज पेरणी काळात अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. मात्र, वर्षानुवर्षेप्रमाणेच यावर्षीही राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांनी शेतकऱ्यांची अवहेलना सुरूच ठेवली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अवघे १५ टक्‍के, तर खासगी बॅंकांनी अवघे १२ टक्‍के कर्ज वितरण करून शेतकऱ्यांबद्दल असलेली अनास्था उघड केली आहे. 

बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान खरीप पिकांवर आधारित असते. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अत्यंत गरजेचे असते. शासनाने खरीप हंगामासाठी सप्टेंबरअखेर कर्जवाटपाची मुदत बॅंकांना दिली आहे. जिल्ह्यात पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट वाढल्याने शेतीसह शेतकरी अडचणीत येत आहेत. असे असतानाही राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांनी कर्ज वितरणात उदासीनता दाखवल्याचे दिसून येत आहे. 

खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक हजार ९२० कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. दहा जुलैअखेर एक हजार १७६ कोटी ९१ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ६१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. मात्र, बॅंकनिहाय ही आकडेवारी पाहता कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आघाडीवर असून, उद्दिष्टापेक्षा पाच टक्‍के जास्त कर्जाचे वितरण केले आहे. या बॅंकेस या हंगामात एक हजार कोटींचे उद्दिष्ट होते. या बॅंकेने एक हजार ४८ कोटींचे वाटप केले आहे. 

राष्ट्रीयीकृत बॅंकाकडून सातत्याने शेतकऱ्यांची अवहेलना केली जात आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २१ राष्ट्रीयीकृत बॅंकांना ७११ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, या बॅंकांकडून दहा जुलैअखेर १०४ कोटी ३६ लाख म्हणजेच उद्दिष्टांच्या अवघे १५ टक्के कर्ज वितरण केले आहे, तसेच दहा खासगी बॅंकांनी २०५ कोटी ७० लाखांच्या उद्दिष्टापैकी २४ कोटी रुपयांचे म्हणजेच उद्दिष्टांच्या अवघे १२ टक्के वितरण केले आहे.

पीक कर्जवाटप 
१०५ टक्‍के जिल्हा सहकारी बॅंक 
१९ टक्‍के स्टेट बॅंक ऑफ इंडिया
१६ टक्‍के बॅंक ऑफ महाराष्ट्र 
१५ टक्‍के बॅंक ऑफ इंडिया 
९ टक्‍के आयडीबीआय बॅंक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Loan Nationalized banks disfavoured