कृषी कर्जास दिरंगाई केल्यास खबरदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

सांगली - बॅंकांनी उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करावा. त्यात दिरंगाई केल्यास खबरदार. मी थेट रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार करेन, असा दम जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी बॅंक अधिकाऱ्यांना भरला आहे. खरीप हंगामासाठीच्या कृषी कर्ज वाटपाची टक्केवारी अतिशय कमी असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करीत बैठकीत झाडपट्टी केली.

जिल्ह्यात कृषी कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट सुमारे २१०० कोटी रुपयांचे आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सुमारे ४९ टक्के कर्जवाटप पूर्ण केले. अन्य बॅंकांची आकडेवारी समाधानकारक नसल्याचा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे आणला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच्या स्वतंत्र बैठकीतही या विषयावर चर्चा केली. त्यांनीही बॅंक अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या ३४ टक्के कर्जवाटप झाले आहे. त्यात काही बॅंकांचे वाटप एक ते तीन टक्के इतके अत्यल्प असल्याचे श्री. काळम-पाटील यांनी सांगितले. अग्रणी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी बॅंकांच्या कर्जवाटपाचे आकडे जाहीर केले. त्यानुसार बॅंक ऑफ महाराष्ट्रचे १८ टक्के, बॅंक ऑफ इंडियाचे ३५ टक्के, सेंट्रल बॅंकेचे पाच टक्के, आयडीबीआय बॅंकेचे ३५ टक्के, आयसीआयसीआय बॅंकेचे ११ टक्के कर्जवाटप झाले आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली. 

ते म्हणाले, ‘‘मी कडक शब्दांत बॅंक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अजून वेळ हातात आहे. शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे कर्ज दिले पाहिजे. काही बॅंकांचे उद्दिष्ट ३०० कोटींपर्यंत आहे. त्यांनी आता वेळ घालवू नये. टाळाटाळ केल्यास थेट रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार केली जाईल.’’

बॅंकांचा अहवाल द्या
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकचे अधिकार देण्याबाबत सरकार विचार करेल, अशी ग्वाही दिली. बॅंका टाळाटाळ करीत असतील तर त्यांचा अहवाल पाठवा, अशी सूचना त्यांनी केली.

Web Title: agriculture loan vijaykumar kalam patil