डोळ्यादेखत कुजली पिके

राजकुमार चौगुले
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - दीड महिन्यांहून अधिक काळ सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरला झाला आहे. पाण्याने साचलेली शिवारे व डोळ्यादेखत कुजणारी पिके असे विदारक चित्र प्रथमदर्शनी जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आहे. गगनबावडा, पन्हाळा, आजरा, चंदगड, गारगोटी तालुक्‍यांत पिकांची वाताहत झाली आहे. हमखास उत्पन्नाचा ऊसही नुकसानीच्या तडाख्यात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर काही तालुक्‍यांमध्ये पंचनाम्याचे आदेश मात्र अद्याप फायलीतच अडकले आहेत.

पाणी साचल्याने उसाची वाढच थांबली आहे. करपा व तांबेऱ्याने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. महसूल, कृषी विभागाने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जोरदार पावसामुळे अजूनही पंचनाम्याचे काम गतिमान नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. या भागात अनेक दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही. भातासह नाचणी, सोयाबीन व अन्य कडधान्ये पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत प्रामुख्याने घेतली जातात. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक क्षेत्र भाताचे आहे. यापैकी ९० टक्के भात याच तालुक्‍यांत होतो. पाऊस भाताला उपयुक्त असला तरी अतिपावसाने नुकसान होत आहे. वाफसा स्थिती नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणेच मुष्कील झाले आहे. पंधरवड्यापासून पश्‍चिम भागातील शिवारामध्ये संचारबंदी असल्यासारखी स्थिती आहे.

नेत्यांनी पुढाकार घ्यावा
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने व्हावेत, अशा मागण्यांची निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली जात आहेत. यावर तातडीने निर्णय होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी मिळेल, याकडे सरकारी यंत्रणेबरोबरच नेत्यांनीही लक्ष घालावे, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.

असे होतेय नुकसान
 ऊस : सुरळीत पाणी गेल्याने ऊस कुजण्याच्या अवस्थेत, अतिपावसामुळे तांबेरा, करपा
 भात : नदीकाठच्या भाताचे बुडाल्याने नुकसान; अतिपावसामुळे भाताची 
वाढ थांबली
 चाऱ्याची पिके : पाणी साचून राहिल्याने चारा पिकांच्या वाढीवर परिणाम

जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. महसूल विभागाच्या मदतीने आम्ही पंचनाम्यास सुरुवात केली आहे. पाऊस व रोग कीड अशा स्वतंत्र पद्धतींनी पंचनाम्याच्या नोंदी होणार आहेत. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सततच्या पावसामुळे माझ्या उसाची वाढ खुंटली आहे. नाममात्र उत्पादनच हाती येईल. परिणामी ऊस शेतीही तोट्यात जाईल. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी, अशी अपेक्षा आहे.  
- सदाशिव पाटील, ऊस उत्पादक, बाजार भोगाव, ता. पन्हाळा 

नुकसानीचे प्रमुख तालुके
पन्हाळा
करवीर
गगनबावडा
आजरा
चंदगड
राधानगरी
शाहूवाडी

Web Title: Agriculture Loss by Rain