कृषी पर्यटनाच्‍या वाटचालीत जिल्हा आघाडीवर

हेमंत पवार
बुधवार, 16 मे 2018

कऱ्हाड - धकाधकीच्या जीवनातून विरंगुळ्यासाठी शहरातील लोक आता ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाकडे वळू लागले आहेत. परंपरागत ग्रामीण संस्कृतीचा बाज राखत सुरू होऊ लागलेल्या कृषी पर्यटन केंद्रांना चांगला प्रतिसादही मिळत असल्याने जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत चालली आहे. सध्या जिल्ह्यात ५० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे सुरू असून, त्यातून रोजगाराचे मोठे साधन निर्माण होऊन अनेकांच्या हाताला कामही मिळाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणून नावारूपास येत आहे.  

नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे शहर आणि जवळपासची खेडीही आता शहराचाच एक भाग होऊन गेली आहेत. शेतीत राबून दिवसरात्र कष्ट करण्यापेक्षा थोडक्‍या पैशाची का असेना पण नोकरी करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. नोकरीनिमित्ताने अनेकजण शहरात येऊन स्थिरावत असल्याने झपाट्याने शहरे वाढून तेथील लोकसंख्याही वाढत चालली आहे. सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे आणि सतत कामाचा ताण असल्याने जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून अनेकजण सध्या पर्यटनासाठी जावू लागले आहेत. जास्त प्रवासापेक्षा थोड्या अंतरावरच असलेल्या कृषी पर्यटनाकडेही लोकांचा ओढा वाढू लागला आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे ५० ते ५५ कृषी पर्यटन केंद्रे असल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे. पूर्वी केवळ एक ते दोन असणारी संख्या गेल्या काही वर्षात ५५ पर्यंत जावून पोचली आहे. त्या माध्यमातून अनेकांच्या हाताला कामही मिळाले आहे. त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार देणारे केंद्र म्हणूनही ते नावारूपास येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणूनही आता नावारूपास येऊ लागला आहे. 

ग्रामीण संस्कृतीचा बाज 
कृषी पर्यटन केंद्रात बैलगाडी, ट्रॅक्‍टरमधून सफर, वेगगवेळ्या पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट, झुलता पूल, विविध प्रकारचे ग्रामीण खेळ, कौलारू आणि छप्परवजा कुटीमध्ये राहण्याची व्यवस्था आदींसह ग्रामीण भागातील पारंपरिक संस्कृतीचा अविष्कार कृषी पर्यटन केंद्रात पाहायला मिळतो. त्यामुळे शहरातील बालचमूंना त्यांचे मोठे आकर्षण दिसून येते. त्यामुळे पर्यटन केंद्रांत गर्दी वाढत आहे.

जिल्हा परिषदेमार्फत प्रशिक्षण 
जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढावी, यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी पर्यटन केंद्र सुरू करू इच्छिणाऱ्यांना आणि ज्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे, त्यांनी ते कसे चालवावे, यासाठीही प्रशिक्षण देण्यात येते. त्या माध्यमातून संबंधितांना त्याची व्याप्ती, भविष्यातील संधी आणि निश्‍चित दिशा मिळत असल्यानेही केंद्रांची संख्या वाढू लागली आहे. 

Web Title: agriculture tourism day special