अहिल्यादेवी हे नाव बरोबर : सोनवणी

sonawani
sonawani

सोलापूर : रामाच्या स्पर्शाने पावन झालेल्या अहल्याचा आणि अहिल्यादेवी होळकर या नावाचा काहीही संबंध नाही. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेला जी पत्र लिहिली त्यात अहिल्यादेवी होळकर हेच नाव आहे, असे धनगर इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावर अहल्या असे नाव हवे, असे वा. ना. उत्पात यांनी सुचविल्याचे आज 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यावर माहिती देताना सोनवणी बोलत होते. 

पहिल्या धनगर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले सोनवणी म्हणाले, "अहिल्यादेवींची अनेक पत्र उपलब्ध आहेत. त्यातही अहिल्यादेवींनी स्वतःचा उल्लेख अहिल्यादेवी असाच केला आहे. शिवाय पेशवे आणि भारतातील इतर राजे व बादशहासुद्धा अहिल्याबाई असाच उल्लेख करतात, हे पाहता वा. ना. उत्पात या उत्पाती माणसाने आपली ब्राह्मणी परंपरा लादण्यासाठी अहल्या-आहिल्या हा बादरायण संबंध जोडला आहे. हा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अहिल्यादेवी हेच नाव ऐतिहासिक असल्यामुळे कोणीही मनात कसलाही संभ्रम निर्माण होऊ देऊ नये."
 
"इजिप्तमधील फराऊ रामशेज आणि भारतातील राम हे नाव एकच आहेत, असे जर कोणी म्हटले तर तो जेवढा वेडेपणा होईल तेवढाच वेडेपणा वैदिक धर्मातील अहल्या आणि प्राकृत परंपरेतील अहिल्या हे नाव एकच समजणे हा आहे. भारतातील वैदिक धर्मीय त्यांचे वर्चस्व ठसवण्यासाठी सामान्य लोकांमध्ये असे अनऐतिहासिक प्रवाद पसरवून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न नेहमीच करताना दिसतात. त्यामुळे बहुजन समाजात आपल्या परंपरेबद्दल व भाषेबद्दल नेहमीच गोंधळ निर्माण झालेली आहे, प्राकृत भाषा या मूळ असून अहिल्यादेवी हे नाव मूळ प्राकृत भाषेतील आहे. संस्कृत ही इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात म्हणजे खूप उशिरा तयार झाली. त्या भाषेला मूळची भाषा असण्याचा कसलाही आधार नाही, असे असूनही प्राकृत भाषेतील शब्दांना मूळ न मानता नंतर आलेल्या संस्कृत भाषेत असलेले शब्द मूळ मागणे हा वैदिक परंपरेचा डाव आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला दिले हे सहन न झाल्याने पोटशूळ उठलेल्यांनी हा वाद निर्माण केला आहे. हा विघ्नसंतोषीपणा आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, " असे संजय सोनवणी यांनी सांगितले.

नामविस्तार समजून घ्या
प्रचलित नावाचा विचार करून मंत्रिमंडळाने अहिल्यादेवी होळकर हे नाव दिले आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे, असे सांगून ज्येष्ठ नेते आण्णा डांगे म्हणाले, "अहि म्हणजे साप असे होत असेल तर नागिन असेही होऊ शकते. अहिल्यादेवी होळकर या नागिणीसारख्या होत्या, असे आपण समजायला हवे. वाद टाळून झालेला नामविस्तार समजून घेतला पाहिजे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com