esakal | बाहेरच्या कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांमुळे नगर जिल्हा बदनाम

बोलून बातमी शोधा

Ahmadnagar district bad name due to students from outside

दहावीच्या शिक्षणाच्या जोरावर काहींना नोकऱ्या मिळाल्या. नोकरी सांभाळून पुढील शिक्षण घेणे त्यांना शक्‍य नाही, तसेच रोज महाविद्यालयात जाता येत नाही. अभ्यासाचा सराव नसल्याने उत्तीर्ण होण्याची सुतराम शक्‍यता नसते. मग अशा विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक कॉपीमुळे बदनाम झालेल्या परीक्षा केंद्रांचा शोध घेतात. अशा परीक्षा केंद्राचा शोध लागला, की तेथील नातेवाइकांशी संपर्क साधून प्रवेश घेतला जातो. बहुतांश हेच विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळून येतात. 

बाहेरच्या कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांमुळे नगर जिल्हा बदनाम
sakal_logo
By
दौलत झावरे

नगर ः बारावीच्या परीक्षेत यंदा तब्बल 89 विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. त्यांत परजिल्ह्यांतील विद्यार्थीच अधिक दिसतात. या बाहेरील परीक्षार्थींमुळे नगर जिल्हा नाहक बदनाम होत आहे. नगरच्या कॉपीमुक्त अभियानात यामुळे अडथळा येत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी आता शिक्षण विभागाने पावले उचलली असून, बारावीला प्रवेश देतानाच विद्यार्थ्याचे निकालपत्र, आधार कार्ड यांची तपासणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 
दहावीच्या शिक्षणाच्या जोरावर काहींना नोकऱ्या मिळाल्या. नोकरी सांभाळून पुढील शिक्षण घेणे त्यांना शक्‍य नाही, तसेच रोज महाविद्यालयात जाता येत नाही. अभ्यासाचा सराव नसल्याने उत्तीर्ण होण्याची सुतराम शक्‍यता नसते. मग अशा विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक कॉपीमुळे बदनाम झालेल्या परीक्षा केंद्रांचा शोध घेतात. अशा परीक्षा केंद्राचा शोध लागला, की त्या अंतर्गत येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये, तेथील नातेवाइकांशी संपर्क साधून प्रवेश घेतला जातो. बहुतांश हेच विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळून येतात. 
जिल्ह्यातील 99 केंद्रांवर बारावीच्या एकूण 66 हजार 908 विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली. त्यांत एकूण 89 जणांना भरारी पथकांनी कॉपी करताना पकडले. या विद्यार्थ्यांची माहिती घेतली असता, त्यांत परजिल्ह्यांतील विद्यार्थी सर्वाधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, अकरावीला प्रवेश देताना विद्यार्थ्याचे दहावीचे निकालपत्र व आधार कार्ड तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

बाहेरील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पाहून व योग्य कारण नसल्यास त्यांचे अकरावी- बारावीचे प्रवेश रद्द केले जातील. त्यानंतर त्यांच्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना कळवून त्यांना त्यांच्या गावाजवळील शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश देण्याची शिफारस केली जाईल. 
- दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 

दहावीचे प्रवेशही रडारवर 
बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठी काही जण परजिल्ह्यांतून येथे नववीतच प्रवेश घेतात. त्यामुळे नववी व दहावीलाही परजिल्ह्यांतील प्रवेशांना अटकाव करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.