नगर मनपाच्या सभेवर "कोरोना'चे सावट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य निवडीच्या प्रस्तावावर व मागील आठ सदस्यांच्या निवृत्ती प्रस्तावावर "स्थायी'चे सभापती मुदस्सर शेख यांनी सही केलेली नाही.

नगर ः महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीसाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सोमवारी (ता. 23) सर्वसाधारण सभा बोलावली आहे. मात्र, सभेच्या अजेंड्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वीच नगरसचिव रजेवर गेले आहेत. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर गर्दीचे कार्यक्रम रद्द होत आहेत. अशा वेळी ही सभा होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्‍त श्रीकांत मायकलवार काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य निवडीच्या प्रस्तावावर व मागील आठ सदस्यांच्या निवृत्ती प्रस्तावावर "स्थायी'चे सभापती मुदस्सर शेख यांनी सही केलेली नाही. जिल्हाधिकारी तथा तत्कालीन प्रभारी महापालिका आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी सदस्य निवृत्तीसाठी झालेल्या सभेचे चित्रीकरण ग्राह्य धरीत नवीन सदस्य निवडीचा प्रस्ताव महापौरांकडे पाठविला होता.

हा प्रस्ताव काल (सोमवारी) सकाळी नगरसचिव एस. बी. तडवी यांनी महापौर कार्यालयात दिला. काल सायंकाळी महापौर वाकळे यांनी सभेच्या अजेंड्यावर स्वाक्षरी केली. त्यानुसार सोमवारी (ता. 23) महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात "स्थायी'च्या नवीन आठ सदस्य निवडीसाठीची सभा होणार आहे.

अजेंड्यावर महापौरांची स्वाक्षरी होण्यापूर्वीच नगरसचिव तडवी दोन दिवसांच्या रजेवर गेले. त्यात "कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची ही सभा होते की नाही, याबाबत संभ्रम आहे. नगरसचिव रजेवरून परतल्यावर आयुक्‍तांशी चर्चा करून त्यांच्या स्वाक्षरीने निर्णय घेणार असल्याचे समजते. 
 

अर्थसंकल्प स्थायी समितीकडे 
महापालिकेच्या अर्थसंकल्पाला 31 मार्चपूर्वी स्थायी समिती व महासभेची मंजुरी मिळणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांनी स्थायी समिती कार्यालयाकडे आज सायंकाळी महापालिकेचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी सादर केला. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची स्थायी समिती व महासभा होईल का, याबाबत आयुक्‍तांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होतो की नाही, याकडे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation may cancel the meeting