गणवेशाचे चारशे रूपये मिळविण्यासाठी आधी पाचशे भरा!

सनी सोनावळे 
बुधवार, 19 जुलै 2017

शाळेतील विद्यार्थी गणवेश अनुदानातून वंचित राहण्याची भीती

राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच सहकारी बँकेतही पालकांनी खाते खोलावे सर्व राष्ट्रीयकृत बँकेना विद्यार्थ्यांचे खाते झिरो बॅलन्सने खोलण्याचे सरकारने आदेश दिले आहेत.
दिलीप गांधी

टाकळी ढोकेश्वर : दरवर्षी जिल्हा परिषदेकडून जिल्हा प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीमार्फत मोफत गणवेश वाटप केले जाते. पंरतु, या वर्षी जिल्हा परिषदेने त्यात बदल करत अनुदान विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतल्याने शाळेचा गणवेशाचे चारशे रुपये मिळविण्यासाठी पालकांना आधी पाचशे रुपये भरावे लागणार आहेत.

जिल्हा प्राथमिक शाळेतील सर्व मुली, अनुसूचित जाती जमातीतील मुले, दारिद्र्य रेषेखालील सर्व मुले अशा सर्वांना शाळेत मोफत गणेवश वाटप केले जाते. पूर्वी या गणवेश वाटपाचे अधिकार मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीकडे होते. त्यामुळे सर्वच मुलांना गणवेश वाटप जुलैपर्यंत होत होते. पंरतु या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेने त्यात बदल करून अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. दोन ड्रेससाठी चारशे रुपये मिळतात दोनशे रुपये भरून एकही ड्रेस मिळत नाही.

ही रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे व पालकांचे संयुक्तिक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागातील पालकांमध्ये याबाबत उदासीनता दिसते. त्याचे कारणही तसेच आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते खोलण्यासाठी खात्यावर पाचशे ते हजार रूपयांपर्यत रक्कम पालकांना स्वतःच्या खिशातून भरावी लागत आहे जिल्हा परिषद शाळेत प्रामुख्याने शेतकरी, शेतमजुर व रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांची मुले शिक्षण घेत आहेत खेडो पाड्यातील वाडी वस्तीवरील पालकांना बँकेत खाते खोलायचे म्हणजे स्वतःच्या रोजच्या रोजंदारीवर पाणी फिरावे लागते परीसरातील काही गावांमध्ये राष्ट्रीयीकृत बँक दूरवर आहेत टाकळी ढोकेश्वर परीसरातील पवळदरा, काळेवाडी, म्हसोबाझाप, गाजदीपूर, वार्हणवाडी या लोकांना पंचवीस किलोमीटर वरून टाकळी ढोकेश्वर येथे खाते खोलण्यासाठी दिवसाची रोंजदारी सोडून यावे लागत आहेत. ह्या सर्वाचा मनस्ताप पालकांना होत आहे त्यामुळे बरेचसे पालक खाते खोलण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी गणवेश अनुदानातून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेने यावर फेरविचार करून गणवेश वाटपाचे अधिकार मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीकडे दिले सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
- डाॅ. सुनिल खेडकर, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती

राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच कोअर बँकिंग पतसंस्था, सहकारी बँक यामधेही पालकांना खाते खोलता येऊ शकते जवळच्या शाखेत त्यांनी खाते खोलुन याचा लाभ घ्यावा.
अशोक कडुस (शिक्षणधिकारी जिल्हा परिषद) 

Web Title: ahmednagar news parner school uniform deposits more than prices