विवाहित तरुणाची आत्महत्या; तळेगाव शिवारातील घटना, दोरीने घेतला गळफास 

हरिभाऊ दिघे
बुधवार, 19 जुलै 2017

तळेगाव दिघे (ता. संगमनेर) शिवारातील जगतापमळा परिसरात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

तळेगाव दिघे (जि. नगर) : विवाहित तरुणाने रात्रीच्या वेळी गळफास घेत आत्महत्या केली. संदीप उर्फ दीपक माधव मते (वय ३०) असे त्याचे नाव आहे. सुती दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह घरासमोर झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला.

तळेगाव दिघे शिवारातील वामनवाडीनजीक असलेल्या जगतापवस्तीवर संदीप उर्फ दीपक माधव मते हा विवाहित युवक कुटुंबीयासमवेत राहत होता. रात्रीच्या सुमारास त्याने घरासमोरील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी कुटुंबियांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिस पाटील देविदास कांदळकर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

सहायक फौजदार अशोक जांभूळकर यांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीनुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. वडील, पत्नी व दोन मुलांसमवेत तो वस्तीवर राहत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Ahmednagar news talegaon dighe suicide