एअरब्रश पेंटिंगमध्ये ‘लईभारी’ कोल्हापूरी हात...

संदीप खांडेकर
बुधवार, 11 डिसेंबर 2019

पक्षी, प्राणी ते देवदेवतांची चित्रे हा कलाकार गाड्यांवर अलगद रेखाटतोय. मोहसीन यांची ही शैली कोल्हापूरकराच्या डोळ्यांत भरली आहे. 

कोल्हापूर - मोहसीन नजीर पठाण यांना पेंटिंगचं भलतंच वेड. कस्टम एअरब्रश शैलीत यांचा हात भारी चालतो. टू-व्हीलर गाड्यांवर विविध कलाकृती रेखाटून त्यांनी नाव कमावलंय. शालेय जीवनातच यांनी रंगरंगोटीचा छंद जोपासला. एका चॅनेलवरच्या काऊटिंग कारच्या कार्यक्रमाची प्रेरणा यांना बदलवणारी ठरली. दीड वर्षात चाळीसहून अधिक गाड्यांवर त्यांच्या हाताने रंग चढलाय. पक्षी, प्राणी ते देवदेवतांची चित्रे ते गाड्यांवर अलगद रेखाटतात. मोहसीन यांची ही शैली यादवनगरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत भरली आहे. 

मोहसीन रमायचा चित्रकलेत

मोहसीन यांचे वडील नजीर पठाण स्क्रॅपच्या व्यवसायातले. मटण मार्केच्या परिसरात त्यांचा व्यवसाय चालतो. फारशी कमाई होईल, याचा भरवसा व्यवसायात नाही. पोटापुरतं कमावण्यात वडिलांना समाधान आहे. शिक्षणाविना आयुष्याची परवड कशी होते, याची सल त्यांना आजही सतावते. आभाळभर अपेक्षा ठेवून त्यांनी मुलगा मोहसीन यांना मेन राजामाराम हायस्कूलमध्ये धडे गिरवण्यास पाठवले. मोहसीन यांच्या डोक्‍यात अक्षरे विसावत नव्हती. चित्र काढण्यात मात्र हात थकत नव्हता. शिक्षकांच्या नजरेत भरणारी चित्रे त्यांच्या हातातून कागदावर उतरायची. प्राणी, पक्षी, निसर्ग, देव-देवता, नदी, डोंगर, तलाव असे कैक विषय त्यांच्या चित्रकलेत आपसूक डोकावायचे. घरच्या मंडळींना चित्रांचे मोठं कौतुक होतं. मोहसीन यांच्या डोक्‍यात मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांचा मुक्काम होत नसल्याने नाराजीही होती. पेटिंगच्या व्यवसायातील मिळकत ते कुटुंबियांच्या हातावर टेकवत राहिले. 

हेही वाचा - अँटिक गाड्यांच्या दुरुस्तीतला हा ‘सिकंदर’ 

इमारतींचे रंगकाम ही मोहसीनने केले 

दहावीच्या निकालाने मोहसीन यांना दगा दिला. दहावीची वारी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. दोन-तीन वाऱ्यांनंतर दहावीच्या निकालात पासचा शेरा आला. गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात ॲडमिशनचा मुहूर्त घडून आला. कुटुंबाला आर्थिक आधार देताना त्यांची शैक्षणिक गाडी अकरावीत पुन्हा अडखळली. आयटीआयमध्ये पेंटिंगच्या ट्रेंडला त्यांचे ॲडमिशन झाले. कोर्स पूर्ण करताना इमारतींच्या रंगकामाचे काँट्रक्‍ट मिळत होते. कोर्सनंतर मुंबईतल्या नामांकित कंपनीत त्यांनी फ्रीजच्या पार्टचे त्यांनी जोडकाम केले. कोल्हापुरात परतल्यावर ट्रकवर देव-देवतांची चित्रे रेखाटण्यात वेळ खर्ची घातला. 

एअरब्रश पेंटिंग मध्ये तो झालाय माहिर

हिस्ट्री चॅनेलवरच्या कार्यक्रमाने त्यांना नवी उभारी मिळाली. मित्राच्या दुचाकीवर कवटीचं त्यांनी चित्र रेखाटलं. कामातील किचकटपणा डोकेदुखी वाढवणारा ठरला. चित्र रेखाटल्यानंतर त्यांच्या मित्राने पाठ थोपटून प्रशंसा केली. एअरब्रश पेंटिंग म्हणजे कॉम्प्रेसर एअर टॅंकशी निगडीत असते. नियंत्रित स्प्रेगनद्वारे पेंट फवारला जातो. ज्यातून समान व सुसंगत चित्र (पेंटींग) पृष्ठभाग मिळते. एअरब्रश पेंटिंगच्या शैलीत टूव्हिलर व कार कस्टम एअरब्रशची त्यांनी निवड केली. काम जोखमीचे असल्याने त्यात चुका सुधारता येत नाही. चित्र किंवा डिझाईन विचारपूर्वक रेखाटावे लागते. एअरब्रशचे काम करताना स्टेन्सिलचा उपयोग ते करत राहिले. टूव्हिलरवर चित्राचे सौंदर्य खुलवताना त्यांनी डोळ्यात तेल घातले. एअरब्रश पेंटिंगमध्ये बाईक, कार एअर ब्रशींग, एअरब्रश मेकप, केकची सजावट, वॉल डिझाईन, टी शर्ट डिझाईन करता येते. त्यांचा टू-व्हिलरला सजवण्यात मात्र हातखंडा बसलाय. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: air brush artist in kolhapur