अजिंक्‍यतारा किल्ला रस्त्याची रुंदी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सातारा - येथील अजिंक्‍यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अरुंद, निकृष्ट होत असल्याने त्याविरोधात सुमित्राराजे कॉलनीसह रस्त्यालगतच्या महिलांनी आंदोलन करत आज दुपारी दोन वाजता काम बंद पाडले. त्याची माहिती मिळताच ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने सोशल मीडियाद्वारे ही बातमी व्हायरल केली. त्याची दखल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी घेऊन एका तासात रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर करण्यासह दर्जेदार कामाचे आश्‍वासन देऊन महिलांचे समाधान केले. त्यामुळे हे काम पुन्हा सुरू झाले.

मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेल्या अजिंक्‍यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी २७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून अजिंक्‍यतारा किल्ला प्रवेशद्वारापासून ते मंगळाई मंदिराच्या वळणापर्यंत ७५० मीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा, तर तेथून खाली विशाल सह्याद्री कॉलनीतील माने यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता केला जात आहे. त्याचे काम पूनम कन्स्ट्रक्‍शन कंपनीला दिले आहे. 

अजिंक्‍य बझार चौकाच्या बाजूला रस्ता पाच मीटर लांबीचा असताना तेथून वर नलावडे कॉलनी, सुमित्राराजे भोसले कॉलनी ते हिलटॉप कॉलनीपर्यंतचा रस्ता केवळ तीन मीटर इतका केला जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर दोन वाहने जाण्याची, तसेच दुचाकी चालकांना समोरून मोठे वाहन आल्यास अडचणी होणार आहे, तसेच हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने ते निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप करत परिसरातील महिलांनी हे काम बंद पाडले. या वेळी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने त्याचे छायाचित्र सोशल मीडियाद्वारे काही ग्रुपमध्ये व्हायरल केली. त्याची दखल आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी घेऊन कार्यकारी अभियंता श्री. पाटील, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांना सूचना केल्या.

श्री. चव्हाण यांनी संबंधित महिलांशी चर्चा करून, तसेच शिवेंद्रसिंहराजे यांच्याबरोबर महिलांचा संवाद घडवून आणला. त्यानंतर हा रस्त्याचे साइडपट्ट्या करून साडेपाच मीटरचे रुंदीकरण करण्याचा निर्णय झाला. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी शाखा अभियंता आर. वाय. शिंदे उपस्थित होते.

अतिक्रमणे हटवणार
अजिंक्‍य बझार चौक ते किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करणे अडचणीचे ठरत आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम हाती घेणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Ajinkyatara Fort Road Width will increase