सत्तेसाठी हापापलेले स्वार्थी लोक पक्षातून निघून जाताहेत : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

अनेक संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी लोक निघून जात आहेत. सत्तेसाठी हापापलेले लोक जरी पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. अनेक संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी लोक निघून जात आहेत. सत्तेसाठी हापापलेले लोक जरी पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी मुलाखती झाल्यानंतर पत्रकारांशी बातचीत केली. पवार म्हणाले, आमच्यातील जे लोक पक्ष सोडून जात आहेत. त्याबद्दल मनाला खूप वेदना, दुःख होत आहे. पण, तेच मनात धरून चालणार नाही. नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन यापुढे आम्ही पक्षाचे काम करू. 

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, सत्तेत राहूनही तुम्ही पिकविण्यासाठी मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवायला हवे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. जनतेच्या प्रश्‍नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही. सरकार नव्याने कर्जमाफी देण्याची तयार करतेय असे विचारल्यावर पवार म्हणाले, जर तसे झाले तर स्वागतच आहे. पण, तसे होणार नाही. कर्जमाफी हे पुन्हा एक मोठे गाजर सरकारकडून दाखविले जात आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपमुळेच शिवसेनेच्या एवढ्या जागा निवडून आल्याचेही त्यांनी सांगितले. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व वंचित बहुजन बाबत बोलताना पवार म्हणाले, 288 जागांमध्ये सामंजस्याने मार्ग काढायला हवा. आम्हीही सामजस्यांची भूमिका घेऊ. यातून योग्य आघाडी होऊन काहीतरी मार्ग निघावा हीच आपली अपेक्षा आहे. समविचारी पक्षाशी एकत्रित आघाडी करण्याचा आमचा विचार आहे. 

स्थानिकांना रोजगारात 75 टक्के संधी 
राज्यात जर आमची सत्ता आली तर स्थानिकांना रोजगारामध्ये 75 टक्के संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यात आघाडी 175 जागा सहज जिंकेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आमदार शिंदे, सोपल गैरहजर 
विधानसभेसाठी इच्छुकांच्या आजच्या मुलाखतीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व बार्शीचे आमदार दिलीप सोपल गैरहजर राहिले. या दोन्ही आमदारांची पक्ष बदलाची चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, सोपल हे श्रीशैलम येथे देवदर्शनासाठी गेले आहेत. बार्शीचे तालुकाध्यक्ष उपस्थित आहेत. शिंदे हे आले नाहीत त्यामुळे याबाबत मी त्यांच्याशी बोलतो असे सांगत हा विषय टाळण्याचा प्रयत्न पवार यांनी केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar attacks on those leaders who leaving the NCP