घोषणांचे पीक जोमात येईल - अजित पवार

घोषणांचे पीक जोमात येईल - अजित पवार

तासगाव - पाच राज्यांतील निवडणुकांतील अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमात घोषणा इतक्‍या होतील की गाजराच पीक जोरात येणार! पाच वर्षांपूर्वीच्या घोषणांच काय झाल? हजारो कोटींच्या घोषणा करत आहेत पण संजय गांधी योजनेचे आणि ठिबक सिंचनच्या अनुदानाचे पैसे अजून का मिळाले नाहीत? याची उत्तरे नागज आणि शिराळ्यात मिळावीत ही अपेक्षा अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी युती सरकारवर टिकेची झोड उठविली. 

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्ता आणि शेतकरी मेळाव्यासाठी माजी मंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, महंकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, तालुका अध्यक्ष डी. के. पाटील, जि. प. पं. स. सदस्य, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारची दयनीय अवस्था झाली आहे, सरकारकडे पैसा नाही, कर्ज प्रचंड वाढले आहे, कामांच्या घोषणा होत आहेत; पण पैसे कुठे आहेत? पूर्वीच्याच कामांची भूमिपूजने केली जात आहेत, किती फसवाल लोकांना? या राजकारणातच पाच राज्ये गेली.

पळताभुई करून सोडू : जयंत पाटील 
बूथवर कार्यकर्ता उभा राहू देणार नाही अशी भाषा काहीजण करत आहेत; पण येत्या लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पळताभुई करून सोडू, भक्‍कम सर्वांना घेऊन जाणारा असा उमेदवार देण्याची तयारी केलीे आहे. थोडा वेळ प्रतीक्षा करा, अशी टिप्पणीही जयंत पाटील यांनी बोलताना केली.

धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, शेतमालाला भाव, दरवर्षी पाच लाख नोक-या, कुठं गेलं ते सारं अशा शब्दात अजित पवार यांनी युती सरकारची खिल्ली उडविली. हा विषय काढला की हे मारुतीरायाची जात काढणार, निवडणूक आली की राममंदिर काढणार. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काय झाले असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. निवडणुका आल्या की बनवाबनवीची भाषा सुरू होते.

आर. आर. आबांचा किल्ला आजही अभेद्य आहे. तो तसाच ठेवू. श्रीमती सुमनताई यांना चांगल्या मतांनी निवडून दिले. येत्या विधानसभा निवडणुकीतही विक्रमी मतांनी निवडून देऊया

- जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

काम करण्याची इच्छा शक्‍ती पाहिजे, आर. आर. आबांनी पाच वर्षांत ५५ हजार युवकांची पोलिस भरती केली, आज शाळांमध्ये शिक्षक नाहीत, नोकर भरती बंद आहे. याचा जाब निश्‍चीत येत्या निवडणुकीत मतदार विचारतील असेही ते म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारच्या घोषणाबाजीची खिल्ली उडविली, खंडाळयाच्या बोगदयापासून ते कवठेमहांकाळपर्यतच्या चोहोदिशांच्या रस्त्यांच्या फोटोंच्या पान पान जाहीरातील पाहिल्यावर रस्तेच रस्ते सगळीकडे दिसू लागले आहेत, पण आमच्या शेतकऱ्यांच्या ठिबकच्या अनुदानाचे काय ? वारं बदलतं आहे, सत्तांतर अटळ आहे

त्यामुळेच घोषणांचे पिक निघू लागले आहे. अशा शब्दात त्यांनी टिका केली. आमदार सुमनताई पाटील यांनीही यावेळी भाषण केले. सुरूवातीला प्रास्ताविक तालुकाअध्यक्ष डी. के. पाटील यांनी केले. शेवटी आभार तासगाव शहराध्यक्ष अमोल शिंदे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com