‘जीएसटी’मुळे व्यापारी मेटाकुटीस - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 जानेवारी 2019

आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांनाबरोबर घेऊन होणार असल्याने भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील निर्धार परिवर्तन सभेत केले.

शिरोळ - नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्‍वासने देऊन सत्ता हस्तगत केली. ‘जीएसटी’मुळे व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. साखरेचे दर तीन हजार ४०० रुपये करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत, असे असूनही या सरकारला शेतकऱ्यांचे देणे-घेणे नाही. ओठात राम व पोटात नथुराम अशा विचारांची माणसे देशाचे व राज्याचे नेतृत्व करीत आहेत. आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांनाबरोबर घेऊन होणार असल्याने भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील निर्धार परिवर्तन सभेत केले.

श्री. पवार म्हणाले, ‘‘बदल करावा म्हणून जनतेने सत्ताबदल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्‍वासने दिली; मात्र सत्ता मिळाल्यानंतर एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. गेल्या वेळची चूक पुन्हा करू नका. तुमच्या मनातील उमेदवार लोकसभेला व विधानसभेला दिला जाईल. त्यांना निवडून देऊन परिवर्तन घडवा.’’

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘देशातील व राज्यातील राजकीय वातावरण बदलल्याने भाजप व शिवसेना युतीसाठी घरभेटी करीत आहेत. दोन्हीही पक्ष सत्तेसाठी लाचार होत आहेत. ही निर्धार यात्रा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मस्तीचा शेवट करणारी यात्रा आहे. जनतेला फसवून देश ताब्यात घेणाऱ्यांना खाली खेचण्याचा निर्धार जनतेने केला आहे.’’

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांनी सत्ता मिळण्यापूर्वी व सत्ता मिळाल्यानंतर केलेल्या भाषणांची चित्रफीत जनतेसमोर दाखवत त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर पडले आहे. यामुळे त्यांचा पाडाव करण्याची जबाबदारी तुमची आहे. जनता निश्‍चितच दोन्ही पक्षांना शिक्षा देईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला.

माजी मंत्री हसन मुश्रीफ, ‘राष्ट्रवादी’चे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar comment