घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्‍यात - अजित पवार

घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्‍यात - अजित पवार

कोल्हापूर - सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्‍यात असून, लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. अशा स्थितीत देशाला वाचविणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारच्या विरोधात युवकांनी एल्गार पुकारावा असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित युवकांच्या एल्गार परिषदेत ते बोलत होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे परिषद झाली. 

आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संध्यादेवी कुपेकर, युवक प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह कोते-पाटील, सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, शिरोळचे नूतन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आर. के. पोवार आदी उपस्थित होते. सुमारे तासाभराच्या भाषणात पवार यांनी केंद्र, तसेच राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

ते म्हणाले, ‘‘देशभरातील सद्यःस्थिती पाहता मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा सरकारचा डाव आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून साडेचार वर्षांपूर्वी सरकार सत्तेत आले खरे; पण सामान्य जनतेला काय मिळाले? लोक महागाईने बेजार झाले आहेत. रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे. शेअर बाजारातील १५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. कंपन्या दिवाळीखोरीत निघाल्या आहेत. गॅस सिलिंडरचा दर नऊशे रुपयांवर पोचला आहे... हे का ते अच्छे दिन! शिवसेना बावचळून गेली आहे. ती सत्तेत आहे की विरोधात हेच समजत नाही. ज्या मागण्या विरोधक म्हणून आम्ही करायला हव्यात, त्या शिवसेना सत्तेत राहून करते. सध्या राज्यात १९७२ पेक्षाही दुष्काळाची गंभीर स्थिती असूनही सरकार कोणतीच पावले उचलत नाही. दुष्काळसदृश असा शब्दप्रयोग करून फसवणे आणि फेकूगिरी करण्याशिवाय दुसरे काही होत नाही. राज्य आर्थिक अडचणीत असताना आम्ही उत्पन्नाचे स्रोत उभे केले. निधीचे कारण सांगून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रखडविण्याचे काम सरकारने केले. यूपीएसी, एमपीएसीचे विद्यार्थी अंधारात चाचपडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.’’ शरद पवार यांना राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी कामाचा ठसा उमटविला, असे सांगून पवार यांनी आपणही नात्यागोत्याचे राजकारण करू नका असा सल्ला दिला.

ते म्हणाले, ‘‘देशाचे कोट्यवधी रुपये मिळवून उद्योगपती पळून गेले. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांचे काय झाले? ही नुसती रेकॉर्डवर आलेली नावे आहेत. अजूनही काही बहाद्दर आहेत, ज्यांची नावे पुढे आलेली नाहीत. करोडो रुपये लुटून ते पळून गेले आहेत. सरकारच्या धोरणाचा पाच कोटी आयटी कंपन्यांना फटका बसला. नोटाबंदी, जीएसटी असे प्रयोग अयशस्वी झाले. स्मार्ट सिटी, मॅग्नेटिक महाराष्ट्राचे काय झाले? मेक इन इंडियात उद्योग आणायले गेले आणि मेळाव्याच्या मंडपालाच आग लागली? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक पूजेच्या वेळी अशीच दुर्घटना घडली. ज्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधांनानी केले, ते तुम्हाला मान्य नाही का? ज्याला निविदा मंजूर झाली, तो काम करेल ना! तुम्ही कशाला गेलात? एका तरुणाचा कारण नसताना जीव गेला. त्याला जबाबदार कोण? पुतळ्याच्या उंचीतही राजकारण आणले गेले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगातील सर्वांत मोठा पुतळा दाखविण्याच्या प्रयत्नात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली गेली. लोकांच्या भावनेशी कसला खेळ करता?’’

‘गेल्या निवडणुकीत प्रत्येकाने कमळासमोरील बटण दाबले आणि याच कमळाबाईने हिसका दाखविला,’ असे सांगून पवार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात एक आणि वागतात एक. त्यास विरोध असल्याचे सांगितले. कोट्यवधींच्या राफेल घोटाळ्यावर ते काहीच बोलत नाहीत. आयबी, आरबीआय, सीबीआसह ज्या ज्या घटनात्मक संस्था आहेत, त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. ते देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक आहे. आपण अपयशी ठरलो, तर भर चौकात फाशी द्या, असे ते म्हणाले होते. संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे. आमदार राम कदम बेताल वक्तव्ये करतात. सत्तेची मस्ती आणि धुंदी चढते, त्या वेळी अशी वक्तव्ये बाहेर पडतात.
भीमा-कोरेगाव दंगल, दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी न सापडणे या बाबी संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

आजोबा, आजोबा पेट्रोलचे दर वाढलेत
पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, की त्याची झळ संसारी माणसाला बसते. नरेंद्र मोदी हे स्वतः फकीर असल्याचे सांगतात. त्यांच्या मागे संसार नाही, नातवंडे नाहीत. ती असती तर आजोबा, आजोबा पेट्रोलचे दर वाढलेत असे त्यांना सांगितले असते. फकिराला संसारी माणसाच्या व्यथा काय कळणार, असे पवार म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

कार्यकर्त्यांची घेतली हजेरी
पवार यांनी प्रत्येक तालुक्‍यातून किती कार्यकर्ते आले याची हजेरी घेतली. तालुकानिहाय हात उंचावण्यास त्यांनी सांगितले. कागलचे नाव राहून गेल्यानंतर उपस्थित निम्म्याहून अधिक माणसे कागल तालुक्‍यातीलच असल्याचे सांगताच सर्वांनाच हसू आवरेना.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com