सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय : अजितदादा पवार

Ajit Pawar Criticised BJP Government and Chief Minister Of Maharashtra
Ajit Pawar Criticised BJP Government and Chief Minister Of Maharashtra

मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी येथील बाजार पटांगणावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, विजयसिंह मोहिते-पाटील, शशिकांत शिंदे, चित्रा वाघ, दत्तात्रय भरणे, संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, दिपक आबा साळुंखे दिपक चव्हाण, रणजितसिंह मोहिते-पाटील, सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अजितदादा पुढे म्हणाले, दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविण्याकरता आघाडीचं सरकार असताना अनेक कामं केली. सिमेंट बंधारे बांधण्याकरिता दहा-दहा कोटी दिले. डी.पी.सी. चा निधी वाढविला पण आपल्या विचाराचं सरकार सत्तेत नसेल तर शेतकरी कसा भरडून निघतोय हे आज आपण पाहतोय. शेतीमालाचे भाव पडलेत, खताच्या किमती वाढल्यात. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. कर्जमाफी करताना साडेचार लाख भरा मग दिडलाख देतो असे म्हणणाऱ्या यांना अक्कल आहे की नाही, असा टोला त्यांनी लगावला.

अजितदादा पुढे म्हणाले की आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देताना हा प्रश्नच आमच्यासमोर नाही आम्ही आरक्षण देवू शकत नाही असे भाजप सरकार सांगते.  आरक्षणच्या लाटेवर जानकर व शिंदेना मंत्रीपद मिळालं अन ते गप्प बसले. धनगर समाजाची फसवणूक या सरकारने केली आहे. राष्ट्रवादीने नेहमीच धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पवारसाहेबांवर टिका करण्याची या मुख्यमंत्र्यांची औकात नाही. गलिच्छ राजकारण करणार्या सरकारविरोधात हे हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. आगामी निवडणुकीत आठही जागा राष्ट्रवादीच्या निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले हल्लाबोल आंदोलनाने सरकारच्या मनात धडकी भरली आहे. भाजप पक्षाने आपल्या नेत्याशी व नेतृत्वाशी बेईमानी केली आहे त्यामुळे ते जनतेशी कधीच इमान राखणार नाही. महामेळाव्यात विकासकामांवर न बोलता फक्त राष्ट्रवादीवर टिका करण्यात धन्यता मानली. मुख्यमंत्र्यांना तर कोणावर टिका करावी याचं भान राहिलं नाही. पन्नास वर्षांचं योगदान असणार्या शरद पवार साहेबांवर टिका करण्याची मुख्यमंत्र्यांची लायकी नाही. अच्छे दिनच्या नावाखाली भाजपने जनतेची फसवणूक केली आहे. आपल्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने आली आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला रांगेत उभं करणार्यांना ऑफलाईन करा असे आवाहन करतानाच कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवायचा निर्णय घेण्याचे आवाहन केले.
प्रभाकर घार्गे म्हणाले की हल्लाबोल आंदोलनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला असून त्यास सामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रभाकर देशमुख म्हणाले की हल्लाबोल आंदोलनामध्ये सामान्य माणसांच्या समस्यांवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. माणमध्ये पाणी समस्या असल्यामुळे, उद्योगधंदे नसल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही. कर्जमाफी व विजमाफी शंभर टक्के व्हावी अशी मागणी या आंदोलनात केली. या सभेस मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अजितदादांनी घेतला पोष्टरबाजीचा समाचार
व्यासपीठाच्या दोन्ही बाजूस स्थानिक नेत्यांची दोन वेगवेगळी पोष्टर पाहून अजितदादांचा पारा चढला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब आहे अन कोणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय शरद पवारसाहेब घेणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संभ्रम निर्माण होईल अशी पोष्टरबाजी मी खपवून घेणार नाही असा इशारा अजितदादा पवार यांनी माणच्या नेतेमंडळींना दिला. तसेच पक्ष एकसंघ राहिला पाहिजे, कुरघोडी सहन केली जाणार नाही असेही ते म्हणाले.

शिखर शिंगणापूर येथून दहिवडीकडे येताना वाटेत वावरहिरे येथे थांबून सर्व नेतेमंडळींनी हातात फावडे व घमेले घेवून श्रमदान केले.

धनंजय मुंडेंचा करिष्मा
धनंजय मुंडे हे भाषणाला उठताच टाळ्या व शिट्ट्यांचा गजर झाला. तसेच त्यांच्या भाषणावेळी वारंवार कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com