मनमानी कारभाराचे आरोप बिनबुडाचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मार्च 2019

मी महिला नगराध्यक्षा असले तरी अबला नाही कोणत्याही दबावाला बळी  पडणार नाही.कामकाज पारदर्शक करणार आहे.जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असे कृत्य माझ्याकडून होणार नाही.येथील नगरसेवकांचे व माझे मतभेद नाहीत.सर्वाना विश्वासात घेऊनच नगरपंचायतीचा कारभार सुरू आहे.
- आकांक्षा जाधव,
नगराध्यक्षा, नगरपंचायत कडेगाव

कडेगाव - शहरात विविध पायाभूत नागरी सुविधा देण्यासाठी सर्व प्रभागात विकासकामे सुरू आहेत.शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. नागरिक व नगरसेवक सुचवतील ती कामे प्राधान्याने मंजूर केली जात आहेत. परंतु आमचेच स्वपक्षीय सहकारी असलेले उपनगराध्यक्ष साजिद पाटील व काही नगरसेवकांनी माझ्यावर केलेले मनमानी कारभाराचे आरोप बिनबुडाचे आहेत.असा पलटवार नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

सत्ताधारी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष साजीद पाटील यांचेसह नगरसेवक राजू जाधव,सागर सूर्यवंशी,श्रीरंग माळी, संगिता राऊत, संगिता जाधव,रिजवाना मुल्ला या सात जणांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांचेवर मनमानी कारभाराचा आरोप करत बंडाचे निशाण फडकावले होते.त्याचा नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांनी आज चांगलाच खरमरीत समाचार घेतला. 

त्या म्हणाल्या, डॉ.पतंगराव कदम यांच्या आशीर्वादाने व शहरातील जनतेच्या विश्वासामुळे मला नगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे.त्यामुळे आमदार मोहनराव कदम व आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे.स्मशानभूमिसमोरील कचरा डेपोवर उभारलेले बालोद्यान मी स्वतः उभा राहून लोकभावनेचा आदर करून कर्मचाऱ्यांमार्फत हटविले. परंतु आरोग्य व स्वच्छता  समितीचे सभापती असलेले उपनगराध्यक्ष साजीद पाटील यांची जबाबदारी असताना ते तिकडे फिरकलेही नाहीत.

तसेच ते आरोग्य व स्वच्छता  समितीचे सभापती असूनही त्यांनी दर महिन्याला या समितीची बैठक घेणे अपेक्षित असताना वर्षभरात फक्त दोनच बैठका घेतल्या आहेत.
ऑक्टोबर २०१८ च्या सभेत चर्चा झालेल्याच विषयांचे प्रोसिडिंग लिहिले आहे.त्यामध्ये अन्य काही विषय घुसडल्याचा आरोप माझ्यावर केला आहे.परंतु त्यानंतर झालेल्या बैठकीत मागील सभेचे इतिवृत्त वाचले  होते.हे इतिवृत्त कायम कसे झाले ? असा सवालही नगराध्यक्षांनी यावेळी उपस्थित केला.

प्रोसेडींगमध्ये ठराव घुसडले असते तर नगरसेवकांनी इतिवृत्त कायम करण्यास विरोध केला असता.यामुळे त्यांचा हा आरोप हस्यास्पद आहे.तेव्हा कोणीही व्यक्तीगत द्वेषापोटी गटतट निर्माण करु नयेत ते योग्य होणार नाही.असा टोलाही त्यांनी शेवटी उपनगराध्यक्षांना लगावला.

मी महिला नगराध्यक्षा असले तरी अबला नाही कोणत्याही दबावाला बळी  पडणार नाही.कामकाज पारदर्शक करणार आहे.जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असे कृत्य माझ्याकडून होणार नाही.येथील नगरसेवकांचे व माझे मतभेद नाहीत.सर्वाना विश्वासात घेऊनच नगरपंचायतीचा कारभार सुरू आहे.
- आकांक्षा जाधव,
नगराध्यक्षा, नगरपंचायत कडेगाव

Web Title: Akansha Jadhav comment