‘अक्षय्य’ मुहूर्तावर ७५ कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

ग्राहकांची झुंबड - सोने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि डिझेल मोटारींना मिळाली पसंती

कोल्हापूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज बाजारात इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, डिझेल मोटारी आणि सोन्याचे दागिने खरेदीसाठी झुंबड उडाली. बाजारात एका दिवसात सुमारे ७५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

नोटाबंदीनंतर मंदीचे सावट असलेला सराफ कट्टा आज दिवसभर गजबजलेला होता. मोबाइल हॅंडसेट आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर गिफ्ट आणि सूट असल्याच्या जाहिरातीमुळे ग्राहकांनी त्याचा विशेष लाभ घेतला.

ग्राहकांची झुंबड - सोने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि डिझेल मोटारींना मिळाली पसंती

कोल्हापूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज बाजारात इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, डिझेल मोटारी आणि सोन्याचे दागिने खरेदीसाठी झुंबड उडाली. बाजारात एका दिवसात सुमारे ७५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

नोटाबंदीनंतर मंदीचे सावट असलेला सराफ कट्टा आज दिवसभर गजबजलेला होता. मोबाइल हॅंडसेट आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर गिफ्ट आणि सूट असल्याच्या जाहिरातीमुळे ग्राहकांनी त्याचा विशेष लाभ घेतला.

शहरातील राजारामपुरी, बागल चौक, शिवाजी रोड, महाद्वार रोडवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी येत होते. अनेक व्यावसायिकांनी शोरूमबाहेर मंडप उभा करून ग्राहकांची सोय केली होती. एलईडी, मोबाइल हॅंडसेटवर सूट दिली जात होती. काही शोरूममध्ये शून्य टक्के व्याज दराने कर्जाची सोय उपलब्ध केली होती. सकाळी नऊपासूनच शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. उन्हाचा तडाखा असल्यामुळे काही शोरूममध्ये दुपारी गर्दी कमी होती. मात्र सायंकाळनंतर बहुतांशी शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती.

नोटाबंदीनंतर मरगळ आलेल्या बाजारपेठेत आजच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताने वेगळीच उंची गाठली. सायकल, डिझेल मोटारी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोन्याचे दागिने यांना ग्राहकांनी पसंती दिली. काहींनी फ्लॅट बुकिंग केले. सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत व्यावसायिकांना प्रतिक्रियाही देण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र होते. ब्रॅंडेड दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेकांना शोरूमबाहेर ‘वेटिंग’ करावे लागत होते. याचबरोबर फर्निचर खरेदीवरही ग्राहकांचा जोर असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

सुमारे दीडशेहून अधिक फ्लॅटची आज खरेदी झाली आहे. रेडी पझेशन फ्लॅटला ग्राहकांनी पसंती दर्शविली. काहींनी आजच्या मुहूर्तावर बुकिंग केले आहे. शहर परिसरातील रिअल इस्टेटमध्ये सुमारे तीस कोटींहून अधिक उलढाल झाली. एकंदरीतच आजचा मुहूर्त ग्राहकांसाठी आणि व्यावसायिकांसाठीही महत्त्वाचा ठरला.
- विवेकानंद पाटील, बांधकाम व्यावसायिक

पेट्रोल महाग झाल्यामुळे डिझेल मोटारींची विक्री अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाली. केवळ ह्युंडाईमध्ये शंभरहून अधिक मोटारींची विक्री झाली. इतर कंपन्यांमध्येही मिळून सुमारे ३०० हून अधिक मोटारींची विक्री झाल्याचे दिसून येते. मोटारींची नवनवी मॉडेल्स्‌ आणि नोकरदारांनी खरेदीसाठी दाखविलेला उत्साह याला महत्त्वाचा ठरला.
- विशाल वडेर, सरव्यवस्थापक, माई ह्युंडाई

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सकाळी दहापासून रात्री दहापर्यंत ग्राहकांची गर्दी होती. कंपनीमेड दागिने खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल राहिला. दिवाळीनंतर पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. विशेष करून नोकरदारांनी दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे दिसून आले. 
- प्रसाद कामत, सराफ

Web Title: akshay tritiya muhurt 75 crore transaction