सावधान... सोलापूरकरांसाठी 'ही' धोक्‍याची घंटा 

सावधान... सोलापूरकरांसाठी 'ही' धोक्‍याची घंटा 

सोलापूर : राज्यातील नऊ शहरांत मागील आठ वर्षांपासून हवा प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकताच प्रसिद्ध केला. त्यामध्ये सोलापूरचाही समावेश असून हवेत नायट्रोजन डाय-ऑक्‍साईड, कार्बन मोनोऑक्‍साईडचे प्रमाण वाढत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या हवा प्रदुषणामुळे शहरातील नागरिकांमध्ये श्‍वसनाचे विकार वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, सोलापुरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा दावा फेटाळून लावला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 72 प्रदूषण मापन केंद्रांद्वारे राज्यातील 25 शहरांतील 10 हजार 164 नमुन्यांचा अभ्यास केला. त्यानुसार 2019 मधील प्रदूषणाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे या शहरांत मागील आठ वर्षांपासून हवा प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एनएसओ-2, एनओ-2, आरएसपीएम, ओझोन, बेन्झिन, सीओ अशा प्रदूषकांचे मिश्रण हवेत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मात्र, हा दावा सोलापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी प्रशांत भोसले यांनी फेटाळून लावला असून शहरातील विविध भागांमधील हवेचे नुमने वालचंद महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाकडून पडताळली जातात, असे त्यांनी सांगितले. मुंबई, पुणे, बदलापूरसह अन्य शहरांच्या तुलनेत आपल्याकडे औद्योगिक वसाहती कमी आहेत, हवा मुक्‍त आहे, आग लागण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचा अभ्यास करावा लागेल, असेही श्री. भोसले यांनी सकाळ शी बोलताना सांगितले. 


ठळक बाबी... 
■ मुंबई, सोलापूर, पुणे, बदलापूर, उल्हासनगर येथील हवेत नायट्रोजन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण सर्वाधिक 
■ सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर या शहरांत ओझोन प्रदूषणात मोठी वाढ 
■ कार्बन मोनोऑक्‍साईडचे प्रदूषण बांद्रा, पुणे, नागपूर, सोलापुरात सर्वाधिक आढळले 
■ बांधकाम साहित्य, रस्त्यांचे तुटलेले दुभाजक, खराब रस्त्यांमुळे सोलापुरात वाढले धुळीचे प्रमाण 

हवा प्रदूषणामुळे होतात आजार
■ हवा प्रदूषणामुळे कमी होते नागरिकांची रोग प्रतिकारक शक्‍ती 
■ मानसिक आजारात होते वाढ तर जननक्षमतेवरही होतो विपरीत परिणाम 
■ डोळे, नाक, फुफ्फुसे, श्‍वसननलिकांचेही वाढतात विकार अन्‌ आजार 
■ वाढत्या हवा प्रदूषणामुळे मिळते कर्करोगाला आमंत्रण 


...या उपाययोजनांची आहे गरज 
■ आयुर्मान संपलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची आवश्‍यकता 
■ जमिनीतील पालापाचोळा जाळू नये : कारखान्यांची यंत्रणा दर्जेदार असण्याकडे द्यावे लक्ष 
■ प्रदूषण नियंत्रणाचे बहुतेक कार्यक्रम कागदोपत्रीच : प्रभावी जनजागृतीची गरज 
■ रस्त्यांमधील दुभाजकांची वाढवावी उंची : दुभाजकातील माती पडतेय रस्त्यांवरच 
■ प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी दंडात्मक कारवाई 

हवेची अशी असावी शुध्दता 
■ सल्फर डाय-ऑक्‍साईड : 77 पीपीबी 
■ कॉर्बन डाय-ऑक्‍साईड : 35 ते 9 पीपीएम 
■ ओझोन : 0.12 पीपीएम 
■ नायट्रोजन डाय-ऑक्‍साईड : 0.053 पीपीएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com