हम ‘गोरे’ है, तो क्‍या हुआ दिलवाले है..!

युवराज पाटील
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

शिरोली पुलाची - आमच्या भाळीच लिहिलं होतं जन्माला अस्संच यायचं. जन्माला आल्यापासूनच आम्ही असे आहोत आणि तसे असल्याचा अभिमानही आहे. लाजायचं कसलं त्यात? निसर्गानं जे दिलं आहे ते स्वीकारलं आहे.

शिरोली पुलाची - आमच्या भाळीच लिहिलं होतं जन्माला अस्संच यायचं. जन्माला आल्यापासूनच आम्ही असे आहोत आणि तसे असल्याचा अभिमानही आहे. लाजायचं कसलं त्यात? निसर्गानं जे दिलं आहे ते स्वीकारलं आहे. माणूस म्हणून साऱ्यांचं रक्त लालच आहे. आम्ही फक्त फटफटीत पांढरे इतकाच काय तो फरक... हाताला कुणी काम देत नाही, म्‍हणून भीक मागून उदरनिर्वाह करणारे दिलीप व सुरेश जाधव संवाद साधत होते आणि त्यांची प्रेरणादायी कहाणी उलगडत होती. दरम्यान, हम ‘गोरे’ है, तो क्‍या हुआ दिलवाले है..! असे हे दोघेही भाऊ अभिमानाने सांगतात

जाधव कुटुंबीय मूळचेच शिरोलीचे. गोपाळ समाजात त्यांच्यासह एकूण पाच कुटुंबं अशीच. या पाचही कुटुंबांतील ३० सदस्य जन्मतःच ‘अल्बिनो’. दिलीप आणि सुरेश यांचे वडील व आई दोघेही असेच. त्यामुळं त्यांनी मुलांचे विवाह करताना त्यांच्यासारख्याच मुली शोधल्या. साहजिकच, त्यांची मुलंही ‘अल्बिनो’च जन्माला आली. दिलीप यांना तीन, तर सुरेश यांना दोन मुलं. भीक मागून जगत असले तरी त्यांनी मुलांना शिकून मोठ्ठं करायचं ठरवलं आहे. पुण्यातील अंधशाळेत सध्या ही पाचही मुलं शिक्षण घेत आहेत. ती शिकून स्वतःच्या पायावर उभी राहतील. आत्मनिर्भर होतील. त्यानंतर तरी समाज त्यांना स्वीकारेल, अशी त्यांना आशा आहे. 

 

जाधव बंधूंना ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे यांनी पुढाकार घेऊन शिरोली ग्रामपंचायतीकडून जागा मिळवून दिली. त्यावर त्यांनी चांगली घरेही बांधली आहेत. किमान काही सुविधा घरात आहेत. मात्र, सततच्या सपत्नीक भटकंतीमुळे त्यांना अधिक काळ बाहेरच राहावे लागते. दिवसा अंधुकसे दिसते आणि सायंकाळनंतर दृष्टी थोडीशी वाढते. उन्हात काम केलं की साऱ्या शरीरावर लाल-तांबूस चट्टे पडतात आणि अंगाची लाही-लाही होते. शिरोलीत असले की कोल्हापूर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करतात. मात्र, केवळ कोल्हापुरात ते कधीच थांबत नाहीत. कधी पुण्यात, कधी मुंबईत, कधी गुजरातमध्ये, तर कधी राजस्थानातील अजमेरमध्ये अशी त्यांची भटकंती ठरलेली असते. 

प्रयत्न केले; पण
भीक मागण्यापेक्षा दुसरा कुठला तरी व्यवसाय करायचा म्हणून पाचही कुटुंबांनी यात्रा-जत्रांच्या काळात खेळण्यांचे स्टॉल मांडले. पण, ग्राहकांनी कानाडोळा केला. व्यवसाय तोट्यात आला. त्यानंतर ‘एमआयडीसी’तील फौंड्रीमध्ये, वीटभट्टी व शेतात कामाला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उन्हामुळे त्रास होऊ लागला. त्यामुळे पुन्हा साऱ्यांनी भीक मागूनच उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला.

परदेशी नोटांचा संग्रह
भीक मागण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानपर्यंत फिरावे लागते. कधी-कधी पाणी पिऊन दिवस काढावा लागतो; तर कधी पोटापुरते मिळते. क्वचित प्रसंगीच रक्कम शिल्लक राहते. भीक म्हणून परदेशी नोटा मिळाल्या. मात्र, त्या कोणी घेत नाही. त्यामुळे परदेशी नोटांचा संग्रह केल्याचे जाधव सांगतात.

आमच्या समाजातच आम्हाला कुणी सामान्य मुली देत नाहीत. त्यामुळे मग आमच्यासारख्याच मुली आम्हाला शोधाव्या लागतात. आमच्यासारख्यांचे विवाह सामान्य मुलींशी झाले तर कदाचित मुलेही सामान्य मुलांप्रमाणे होण्याची शक्‍यता असते. पण, समाजच स्वीकारत नाही, मग इतर समाजाकडून काय अपेक्षा करणार? शेवटी वास्तव स्वीकारावंच लागतं. 
- दिलीप जाधव

Web Title: albino person family special