सावधान! आपले पाल्य कॅफेत जात नाही ना?

विद्यानगर - एका कॅफेत असलेले फिल्मिंग आणि कंपार्टमेंट नागरिकांनी काढून टाकले.
विद्यानगर - एका कॅफेत असलेले फिल्मिंग आणि कंपार्टमेंट नागरिकांनी काढून टाकले.

कऱ्हाड - पालकांनो, सावधान! आपले पाल्य महाविद्यालयात गेल्यावर कॅफेत तर जात नाही ना, याची नक्की खातरजमा करून घ्या. कारण शिक्षणासाठी येणाऱ्या युवक-युवतींना एकांत मिळावा, यासाठी विद्यानगर परिसरात सुरू झालेले कॅफे अश्‍लील कृत्यांमुळे बदनाम होऊ पाहत आहेत. त्यामुळेच कॅफेमुळे विद्यानगरला लागत असलेला डाग पुसण्यासाठी सैदापूर ग्रामस्थ एकवटले आहेत. कॅफेतील गैरकृत्याला आळा घालण्यासाठी सैदापूरवासीयांनी केलेल्या निर्धाराने अनेक युवक-युवतींच्या पाल्यांच्या जिवाला लागणारा घोर कमी होण्यास निश्‍चित मदत होईल. मात्र, त्यासाठी पालकांनी सजग राहण्याची गरज निर्माण होत आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून कऱ्हाडलगतच्या सैदापूरच्या हद्दीत विद्यानगरी वसली आहे. सुमारे ५०० मीटरच्या अंतरावर बाराहून अधिक महाविद्यालये उभी राहिली. आजमितीस सुमारे २५ हजारांहून अधिक विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. या भागात गेल्या चार वर्षांपासून ‘कॅफेचे फॅड’ निर्माण झाले. आज विद्यानगर परिसरात १७ कॅफे आहेत. मात्र, त्यातील बहुतांशी ‘कॅफे’ बदनामीच्या फेऱ्यात आहेत. युवक-युवतींना एकांत मिळावा, यासाठी कॅफेमध्ये सोय केली आहे. कॅफेत गेलेल्या व्यक्तीस समोर कोण आहे, हे ही तिथे असणाऱ्या अंधाऱ्या तसेच मंद प्रकाशात ओळखू येत नाही. त्यातही आतमध्ये युवक-युवतींना एकांतपणा मिळावा यासाठी दोघांना खेटून बसता येईल अशा प्रकारे पार्टीशन केल्याने त्यात दुसऱ्याला प्रवेशही मिळत नाही. त्यामुळे तेथे नेमके चाललंय काय ? हे समजतही नाही. कॅफेचे स्वरूप हे पारदर्शी हवे असताना कोंदट व अंधाऱ्या वातावरणामुळे युवतींनाही घाबरल्यासारखे होणारे आहे. तरीही युवती बिनधास्तपणे त्या वातावरणात जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होते. कॅफेत युवक व युवती एकत्रित किती वेळ घालवणार, त्यावर तेथील बिल ठरते.

त्यामुळे अशा वातावरणात अनैतिक गोष्टींना चालना मिळत असल्याचे बोलले जाते. सैदापूरच्या वैशाली जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांना निवेदन दिले. त्यावर पोलिसांनी कॅफे चालकांना नोटीस देवून ते बंद करण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याने गैरप्रकार तसेच सुरू आहेत. गेल्या आठवड्यरात जाधव यांनी महिलांसोबत काही कॅफेवर छापा टाकला तेथेही अंधाऱ्या वातावरणात युवक-युवतींच्या सुरू असणाऱ्या अश्‍लिल चाळ्यांनी महिलांना अक्षरशः मान घाली घालायला लावल्याचे सांगण्यात येते. 

विद्यानगरीमुळे देशात लौकिक मिळालेल्या सैदापूरचे नाव कॅफेतील गैरकृत्यांमुळे मलिन होत असल्याने सैदापूरवासीयांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन कॅफेचा पारदर्शीपणे व्यवसाय न करणारे कॅफे बंद करण्याचा निर्धार केला. या वेळी बैठकीतूनच उठून ग्रामस्थांनी कॅफेवर धाव घेऊन चालकांना इशारा दिला. त्यावेळी काचेवर असलेल्या काळ्या फिल्मिंग तसेच आडोशासाठी लावलेले पडदे काढून टाकण्यात आले. सैदापूरवासीयांच्या आक्रमकतेमुळे कॅफे चालकांना व्यवसायाचे स्वरूप बदलावे लागणार आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार, हे नक्की. पोलिसांनीही या व्यवसाय करणाऱ्यांकडे नेमकी कसली परवानगी आहे? तेथे गैरकृत्य होत असल्यास कारवाईचे हत्यार उपसणे गरजेचे आहे.

कमाईचा नवा फंडा...
विद्यानगरमधील सध्याचे वातावरण पालकांना घोर लावणारे आहे. कॅफेबरोबरच काहीजण भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोल्यांचा वापर युवक-युवतींना एकांतपणा मिळावा यासाठी करत असल्याचे बोलले जाते. त्यासाठी संबंधितांकडून जादा पैसे आकारून काहींनी पैसे कमावण्याचा नवा फंडा शोधल्याचे बोलले जाते. त्यामुळे आपर्टमेंटमध्ये अशा प्रकारे गैरप्रकार सुरू असल्याने स्थानिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, उघडपणे कोणीही त्याबाबत आवाज उठवत नाही. 

युवक- युवतींच्या मित्रत्वाचे संबंध असावेत. मात्र, ‘कपल कॅफे’च्या नावाखाली सुरू असलेल्या ठिकाणी अंधाऱ्या ठिकाणी केवळ दोघेजण बसणे, तेथे अश्‍लिल चाळे करणे, हे योग्य नाही. यातून युवक-युवतींच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘कपल कॅफे’ची संस्कृती  सैदापुरात चालू देणार नसून, त्यासाठी ग्रामस्थ तसेच विविध संघटनाही पाठीशी आहेत.    
- वैशाली जाधव, सैदापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com