अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सभेत इतिवृत्त मंजूरीवरून गोंधळ

 अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सभेत इतिवृत्त मंजूरीवरून गोंधळ

कोल्हापूर - राज्य शासन आणि विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या धर्तीवर आता प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा होणार आहे. महामंडळाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजूर झाला. सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी पन्नास लाखांची तरतूदही करण्यात आली. 

येथील मार्केट यार्डातील राजर्षी शाहू सांस्कृतिक भवनात २०१६ ते २०१८ या तीन आर्थिक वर्षांची सभा झाली. सुरवातीपासूनच गोंधळाची परंपरा या सभेतही कायम राहिली. मात्र, तब्बल पाच तासांच्या चर्चेनंतर विविध विषय मंजूर होऊन सभेची सांगता झाली. 

दृष्टिक्षेपात सभा...

  • गोंधळातच सभेला प्रारंभ. अहवाल न मिळणे, इतिवृत्त कायम करण्याबरोबरच ओळखपत्र व निवडणूक अनामत रकमेच्या विषयांवर गोंधळ.
  • चालू आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा सप्टेंबरमध्ये होणार
  • अभिनेत्री उषा नाईक यांचे आजीव सभासदत्व मंजूर
  • राज्यभरातून आलेल्या सभासदांची जिल्हानिहाय शाखेची मागणी
  • प्रतीक जोशी यांच्याकडील वसुलीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती
  • एकाच वेळी चार ते पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी समन्वय समितीची मागणी

दरम्यान, सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सुचवलेली घटना दुरुस्तीही या सभेत मंजूर झाली. त्यानुसार येथून पुढे महामंडळावर पंधराऐवजी सतरा संचालक निवडून येतील. त्याशिवाय कार्यकारिणीला आवश्‍यक वाटल्यास दोन स्वीकृत सदस्य घेता येणार आहेत.  

सभेच्या सुरवातीलाच ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी अहवाल वेळेत मिळाला नसल्याची तक्रार केल्याने दहा ते पंधरा मिनिटे गोंधळ उडाला. त्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली; पण मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावर पुन्हा गदारोळ सुरू झाला. अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, महेश पन्हाळकर, अशोक जाधव आदींनी जोरदार आक्षेप घेतले. मंजूर-नामंजूरच्या घोषणा सुरू झाल्याने आवाजी मतदानाने अखेर इतिवृत्त मंजूर झाले. त्यानंतर तीन वर्षांचा ताळेबंद व अंदाजपत्रकाच्या विषयावरही काही काळ गोंधळ झाला. पण, तिन्ही वर्षांतील ताळेबंद मंजूर झाले.

घटनादुरुस्तीतील स्वीकृत सदस्यांच्या विषयावर आकाराम पाटील यांनी सूचना मांडली. त्यानुसार दोन स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय झाला. अर्जुन नलवडे यांनी रसिक सभासदांबाबत सूचना मांडली. त्यानुसार रसिक सभासद नोंदणीचा ठरावही मंजूर झाला. माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, वासू पाटील, बाबा पार्टे, किसन कल्याणकर, अरुण भोसले, स्वप्नील पार्टे, रवी गावडे, अवधूत जोशी, हेमसुवर्णा मिरजकर, शुभांगी साळोखे आदींसह सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.  

महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाची भूमिका सांगितली. ते म्हणाले, ‘‘महामंडळाची सभासद संख्या तीन वर्षांत दुपटीने वाढली आहे. एकूण ३५ हजार सभासदांपैकी चार हजार दोनशे सभासद निर्माते असून लवकरच ही सर्व यादी ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे. मराठी चित्रपटांवरील जीएसटी, सुलोचना दीदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे मुंबईत कार्यालय आदी विषयांसाठी पाठपुरावा केला.’’ 

तालुक्‍याच्या ठिकाणी एसटी स्टॅंडवर मिनी थिएटरसाठी पाठपुरावा सुरू आहे. अनुदानाची थकीत रक्कम शासनाकडून निर्मात्यांना मिळवून दिली. त्याशिवाय अनेक जाचक अटी शिथिल करून घेतल्या. महामंडळातर्फे ‘चित्रशारदा’ मासिक लवकरच सुरू केले जाणार असून बोगस ऑडिशन पूर्ण बंद झाल्या आहेत. शाखा वाढवल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढले आहे. ज्येष्ठ कलाकार व कामगारांना पेन्शन योजना सुरू केली असून सध्या ७८ लोकांना त्याचा लाभ मिळतो. येत्या काळात ही संख्या पाचशेवर नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सभेला महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह रणजित जाधव, खजानीस संजय ठुबे, विजय खोचीकर, शरद चव्हाण, पितांबर काळे, मधुकर देशपांडे, सतीश रणदिवे, सतीश बिडकर, सुशांत शेलार, अभिनेत्री वर्षा उसगावकर, निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, विजय पाटील, ॲड. प्रशांत पाटील, ॲड. मंदार जोशी आदी उपस्थित होते. 

मुख्य ऑफिस कॉर्पोरेट 
खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभ व प्रभात तुतारी शिल्पाचे नूतनीकरण होणार असून येत्या वर्षभरात या दोन्ही स्मारकांना पर्यटक भेट देतील, अशा पद्धतीने ती विकसित करण्याचा महामंडळ प्रयत्न करणार आहे. कोल्हापुरातील मुख्य कार्यालयाला नवी जागा घेऊन कॉर्पोरेट लूक दिला जाणार आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याशिवाय पुणे, मुंबई कार्यालयांसाठीही जागेबाबत सभेत सकारात्मक चर्चा झाली. चित्रनगरीत चित्रीकरणासाठी निर्मात्यांसह विविध दूरचित्रवाहिन्यांना निमंत्रण दिले असून लवकरच एका मालिकेचे चित्रीकरण चित्रनगरीत होणार आहे. 

मुंबईत दोन फ्लॅट
मुंबईत कामाच्या निमित्ताने अनेक सभासदांना यावे लागते. मात्र, एक-दोन दिवसांचेच काम असेल तर निवासाची व्यवस्था अशक्‍य असते. या पार्श्‍वभूमीवर महामंडळ मुंबईत दोन फ्लॅट भाड्याने घेणार असून तेथे तासनिहाय अत्यल्प शुल्कावर निवासाची सुविधा दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com