'त्या' नगरसेवकाला अटक करण्याची सर्व पक्षीयांची मागणी

 All party's members demand the arrest of 'that' corporator
All party's members demand the arrest of 'that' corporator

इस्लामपूर (जि. सांगली) : मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना धमकी देणाऱ्या राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याना तातडीने अटक करावी, अशी सर्वपक्षीय मागणी आज येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळूनही त्याला अटक केली जात नाही याचा अर्थ पोलिसांवर कोणाचातरी दबाव असावा अशी शंका व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी दबाव झुगारून येत्या चोवीस तासांत अटक न केल्यास सर्वपक्षीय समितीतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पोलिस जबाबदार असतील असा इशारा दिला आहे. 

इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी वगळता इतर सर्वपक्षियांनी स्थापन केलेल्या समितीमार्फत नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले,""इस्लामपूर शहराच्या इतिहासातील तो काळा दिवस होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता आदर्शवत काम करणाऱ्या महिला मुख्याधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करणे,त्यांना शिवीगाळ करणे ही दुर्दैवी व लज्जास्पद बाब आहे. त्यांनी 28 एप्रिलला गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपी मोकाट आहे.

न्यायलयीन बाब असल्याने अनेकजण याबाबत बोलायला इच्छुक असूनही बोलत नव्हते. मात्र आठ ते दहा दिवस उलटून गेले तरी पोलिस काहीच कार्यवाही करत नसल्याने जनतेचा आवाज म्हणून आज पोलिसांना निवेदन दिले आहे. खंडेराव जाधवना फरार काळात ज्यांनी सरंक्षण दिले आहे त्यांनाही सहआरोपी करावे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचे निवेदन देणार आहोत. या प्रकरणात पोलिसांच्यावर प्रचंड दबाव असल्याने पोलिस हतबल असावेत.

मी मंत्र्यांच्या किती जवळ आहे हे दाखवण्यासाठी मंत्र्याच्या एका मिरवणुकीत त्यांच्या जीपमध्ये त्यांच्याबरोबर उभा होता. मंत्र्यांच्या प्रत्येक फोटोत त्यांच्यापेक्षा याचाच फोटो मोठा असतो. त्याला जनतेने नाकारूनही नेत्यांनी स्वीकृत केले. त्यामुळे त्याचा बेफिकीरपणा वाढला. त्यातूनच कंटेन्मेंट झोनमधून नगरपालिकेच्या घंटागाडीतून दारू वाहतूक करण्याचा लाजिरवाणा प्रकार घडलाय. अशा वृत्तीला लगाम घालण्याचे काम पोलिसांनी करावे. यापूर्वीही त्याने काही मुख्याधिकाऱ्यांना धमकी दिल्याची चर्चा आता समोर येत आहे. यापुढे आम्ही अशा मस्तवाल, बेफिकीर वृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. पोलिसांनी श्रीमंत, राज्यकर्ते यांच्यासाठी वेगळा आणि गोरगरिबांच्यासाठी वेगळा कायदा लावू नये.'' 

नगरसेवक अमित ओसवाल म्हणाले,राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या घटनेला पाठिंबा आहेका? पक्षाने याबाबत जाहीर भूमिका घ्यावी नसेल तर संबंधिताची तत्काळ पक्षातून हकालपट्टी करावी. कॉंग्रेसचे विजय पवार म्हणाले,""राष्ट्रवादीकडे जराजरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी त्याचे गांधी चौकात बड्या नेत्यांसोबत असलेले डिजिटल काढून त्याची पक्षातून हकालपट्टी करावी. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष गुंडांचे समर्थन करणारा पक्ष नाही, हा संदेश लोकांमध्ये जाईल.

शाकिर तांबोळी म्हणाले,""लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त असताना एवढा मोठा आरोपी फरार होतोच कसा? त्यावरून पोलिसांच्या कृतीबद्दलच संशय व्यक्त होतो.'' यावेळी नगरसेवक वैभव पवार, चेतन शिंदे, सतीश महाडिक, महेश पाटील, गजानन फल्ले, अजित पाटील, मकरंद करळे, सतेज जयवंत पाटील, अशोक खोत, सनी खराडे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com