युती-आघाड्यांचे गणित जुळवणे सुरू.

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

त्रिशंकू शक्‍यता; पाच वर्षे रंगणार अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची संगीत खुर्ची?

त्रिशंकू शक्‍यता; पाच वर्षे रंगणार अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची संगीत खुर्ची?
सांगली - जिल्हा परिषदेत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्‍यता नसल्याचे साऱ्यांचे अंदाज आहेत. त्यामुळे त्रिशंकू अवस्था झाली, तर युती कोणाशी, आघाडीत कोणाकोणाला घ्यायचे याचा विचार करून पुढच्या राजकीय खेळ्या कशा खेळायच्या यावर विचार सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कोणीच स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी ३१ हा जादुई आकडा गाठू शकणार नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणते दोन पक्ष एकत्र येणार यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. मावळत्या सभागृहात राष्ट्रवादीने अध्यक्ष, पदाधिकारीपदी सर्वाधिक लोकांना संधी देण्यासाठी प्रत्येक १५ महिन्यांप्रमाणे पाच वर्षांत २४ जणांना पदाधिकारी म्हणून संधी दिली. यंदा नव्या सभागृहात वर्षाला पदाधिकारी बदलल्यास हा आकडा आणखी वाढेल. 

झेडपीचे अध्यक्षपद पहिली अडीच वर्षे खुले राहणार आहे. यामुळे नव्या सभागृहात पहिल्यांदा अध्यक्षपद मिळू शकेल, असे दावेदार कोण, याची आतापासून जोरदार चर्चा रंगली आहे. कोणाची सत्ता येणार आणि कोणाला अध्यक्षपदाची लॉटरी लागणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.  

झेडपीच्या ६० गटांसाठी २२५, तर दहा पंचायत समितींच्या ११८ गणांसाठी ३६७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात काल बंद झाले. गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. दुपारपर्यंच सर्व चित्र स्पष्ट होईल.

झेडपीवर सत्तेसाठी ३१ हा सदस्यांचा आकडा पार करावा लागेल. मात्र तो एक पक्ष गाठू शकेल, अशी सध्या व्यक्त केल्या जाणाऱ्या अंदाजानुसार स्थिती नाहीच. जादुई आकडा पार करून कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट झाल्यानंतरच त्या-त्या पक्षांतील अध्यक्षपदाचे दावेदार ठरतील. सध्या तरी खुल्या गटातून प्राधान्यांने निवडून येणाऱ्या १९ जणांची अध्यक्षपदावर नजर असेल. 

झेडपी निवडणुकीत विजयी होतील व काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी इच्छुक असू शकतील, अशांत विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख (कोकरुड), माजी उपाध्यक्ष दिवंगत मोहनराव भोसले यांचे पुत्र जयदीप भोसले (खरसुंडी), आमदार पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड (कुंडल), ‘कृष्णा’ कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील (बोरगाव), वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक निवास पाटील (कवलापूर), जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रमसिंह सावंत (उमदी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

झेडपीवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आल्यास अध्यक्षपदी ‘क्रांती’ चे अध्यक्ष अरुणअण्णा लाड यांचे पुत्र शरद लाड (कुंडल), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे (बागणी), राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील (बोरगाव), राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे पुत्र संजय पाटील (चिकुर्डे), ॲड. चन्नाप्पा होर्तीकर (उमदी) हे दावा सांगू शकतात, 

तर भाजपकडून कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत (बागणी), भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर (खरसुंडी), खासदार संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील (चिंचणी), माजी सदस्य सुनील पाटील (विसापूर), शिवाजी डोंगरे (कवलापूर), जिल्हा बॅंकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख (कडेपूर) यांच्या नावांची चर्चा आहे. 

या लढतींकडे आहे लक्ष...
मांगले (ता. शिराळा) - माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्‍विनी (राष्ट्रवादी) व झेडपीचे माजी सभापती उदयसिंग नाईक यांच्या स्नुषा अनन्या (भाजप) 
नागेवाडी (ता. खानापूर) - आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास (शिवसेना) व माजी सदस्य बाबासाहेब मुळीक यांचे भाचे वैभव माने (काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी) 
कसबे डिग्रज (ता. मिरज) - विशाल चौगुले (काँग्रेस) व आनंदराव नलावडे (राष्ट्रवादी)
कवठेपिरान (ता. मिरज) - सुरेखा आडमुठे (स्वाभिमानी) व सुनीता आवटी (राष्ट्रवादी)
देशिंग (ता. कवठेमहांकाळ) - माजी पंचायत समिती सभापती सुरेखा कोळेकर (काँग्रेस-भाजप पुरस्कृत) व संगीता नलवडे (राष्ट्रवादी)

गत वेळचे बलावल
राष्ट्रवादी    ३३
काँग्रेस    २३
विकास आघाडी    ३
अपक्ष    २
जनसुराज्य    १
एकूण    ६२

Web Title: alliance aghadi calculation in zp