बनावट उतारे करून घरकुलवाटपाचा संशय 

संजय काटे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सांगवी दुमाला येथे तीन वर्षांत झालेल्या घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची आणि जमिनीचे बनावट उतारे करून घरकुलवाटप झाल्याची चर्चा आहे. तेथील 73 घरकुलांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या योजनेत मोठे गौडबंगाल असल्याचे समजते. 

श्रीगोंदे : सांगवी दुमाला येथे तीन वर्षांत झालेल्या घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची आणि जमिनीचे बनावट उतारे करून घरकुलवाटप झाल्याची चर्चा आहे. तेथील 73 घरकुलांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या योजनेत मोठे गौडबंगाल असल्याचे समजते. 

भीमा नदीकाठी असणाऱ्या सांगवी दुमाला येथे मोठ्या प्रमाणात गायरान जमीन आहे. या जमिनीचे बनावट उतारे दाखवून तेथे गेल्या तीन वर्षांत घरकुलवाटपाचा गैरप्रकार समोर येत आहे. यात तत्कालीन ग्रामसेवक व महसूल यंत्रणा दोषी असण्याची शक्‍यता असून, तक्रारी सुरू झाल्यानंतर गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी चौकशी समिती नेमली आहे. 

एकापेक्षा जास्त घरकुले

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, तेथील एका व्यक्तीने वरिष्ठ कार्यालयाकडे घरकुल घोटाळ्याबाबत तक्रार केली. तेथील घरकुल योजनेत संगनमताने गैरव्यवहार झाला असतानाच जे नियमित लाभार्थी आहेत, त्यांनाही अनुदानाचे हप्ते वेळेवर मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. बनावट उतारे सादर करून घरकुले वाटप होत असतानाच, एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त घरकुले देण्याचा प्रतापही घडल्याची माहिती आहे.

तक्रार अर्जाने पर्दाफाश

त्यातच भर म्हणजे ज्या जागेवर कागदावर घरकुले दाखवली आहेत, तीही बांधकामे झाली नसल्याचे समजते. अनेक लाभार्थींना अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर पुढचे हप्ते मिळाले नसल्याचे समजते. या सगळ्या गोंधळाचा तक्रार अर्जाने पर्दाफाश केल्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी जागे झाले. 

आताही चौकशी समिती नेमली असली, तरी संबंधित तक्रारदाराने त्याचा अर्ज मागे घेतल्यास चौकशी थांबू नये किंवा या फेऱ्यात गरिबांवर अन्याय होऊ नये, हीच अपेक्षा तेथील रहिवासी व्यक्त करत आहेत. 
 

चौकशी समिती नेमली

सध्या कार्यरत असलेल्या तेथील ग्रामसेवकाने घरकुलवाटपात गैरप्रकार आपल्या निदर्शनास आणून दिले. शिवाय एक स्थानिक नागरिकाचा तक्रार अर्जही कार्यालयात मिळाला आहे. या प्रकरणी दोन विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होईल. 
- प्रशांत काळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, श्रीगोंदे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allotment of home based on fake solution