मुलींना खांदा द्यायची परवानगी द्या...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

आमसभा पूर्वतयारी बैठक : अनिष्ठ प्रथांना मूठमाती देण्यास मराठा समाजातील महिलांनी सज्ज राहण्याचे आवाहन

आमसभा पूर्वतयारी बैठक : अनिष्ठ प्रथांना मूठमाती देण्यास मराठा समाजातील महिलांनी सज्ज राहण्याचे आवाहन
कोल्हापूर - कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास मुलींना खांदा द्यायची परवानगी द्या, मराठा समाजाची नियमावली करा, कर्ज काढून सण साजरे करणे बंद करा, अशा थेट मागण्या मांडत मराठा समाजातील महिलांनी प्रबोधनाचा आज येथे जागर घातला. निमित्त होते अखिल भारतीय मराठा समाजातर्फे 30 एप्रिलला होणाऱ्या मराठा आमसभेच्या पूर्वतयारीचे. अनिष्ठ प्रथांना मूठमाती देण्यासाठी मराठा समाजातील महिलांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीप्रमुख शैलजा भोसले यांनी आज येथे केले.

श्रीमती भोसले म्हणाल्या, 'मराठा क्रांती मोर्चा, चक्का जाम आंदोलन, पंढरपूर मोर्चातून आपण एकत्र येत आहोत. आता परंपरेने आलेल्या अनिष्ठ प्रथांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. मराठा भवन साकार करून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करणे आवश्‍यक आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र साकारून त्यांच्यातून अधिकारी निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांनीही आपल्यात बदल घडवून बारसे, विवाहातील अनावश्‍यक प्रथा बंद करायला हव्यात. मराठा भवनसाठी निधी देण्याची मानसिकता ठेवणे हितावह ठरणार आहे.''

दीप्ती सासने म्हणाल्या, 'मुली वाचवा, त्यांना शिकवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. मुलींना स्वातंत्र्य दिल्यास त्या समाजात निश्‍चित सकारात्मक बदल घडवतील. त्यांच्यावर बंधने कशासाठी ठेवता? कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांना खांदा देण्याची परवानगी द्या.''

सीमा मगदूम यांनी महिलांच्या विचारांत सुधारणा झाली, तर समाजात बदल घडेल, असा विश्‍वास व्यक्त केला. शारदा पाटील यांनी अनावश्‍यक खर्चाला आळा घालून मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची तरतूद करावी, असे आवाहन केले. तसेच मराठा समाजातून अधिकारी झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. वनिता पाटील यांनी मराठा भवनसाठी निधी देण्यासाठी पुढाकार घ्या, असे सांगितले. बबीता जाधव यांनी मराठा भवनचे स्वप्न साकार झाल्यास त्याचा समाजातील घटकांना फायदा होईल, असे स्पष्ट केले. संगीता राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 76 समाज एकत्र आले आहेत, असे सांगितले. नेहा मुळीकने समाजातील युवतींचा उच्च शिक्षणातील टक्का वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत समाजाला दिशा देण्यासाठी युवतींनी पुढे यावे, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मराठा भवन, मराठा आरक्षण व मराठा आचारसंहितेसाठी आमसभा यशस्वी करण्याचा निर्धार केला. या प्रसंगी नगरसेविका सुनंदा मोहिते, अंजली समर्थ, कांचन पाटील, सुनंदा भिंगुडे, मंगल कुऱ्हाडे, उज्ज्वला जाधव, सुमन इंगळे, उज्ज्वला पंतोजी, वंदना भडकुंबे, सुवर्णा जंबेडे, सुशीला कासारकर, मेघना साळुंखे, वैष्णवी शेळके, सविता होनगेकर, कविता सासने आदी उपस्थित होत्या.

'परंपरा व आर्थिक समस्येत समाज अडकला आहे. महिलांत इतका न्यूनगंड आहे, की कर्ज काढून सण साजरे केले जातात. आर्थिक सुबत्ता नसताना ही उठाठेव परवडणारी नाही. काही वर्षांपासून मूठभर रक्षेसारखा उपक्रम समाजातर्फे सुरू आहे. त्याचा अधिकाधिक लोकांनी स्वीकार करावा. समाजाची नियमावली तयारी करून सण, समारंभ पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी सज्ज राहावे.'
- विद्या साळोखे, प्राचार्य

Web Title: Allow the girls to shoulder ...!