अमरच्या पत्नीचा धीरोदात्तपणा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - पतीच्या मृत्यूचे दु:ख तर आहेच; पण अशा प्रसंगातही धीरोदात्तपणा दाखवून अमर पांडुरंग पाटील यांच्या पत्नी मयूरी यांनी पतीच्या शरीरातील अवयवदानास एका क्षणात मान्यता दिली. दु:खाचा आवेग गळ्यापर्यंत येऊन दाटलेला असताना त्यांनी डॉक्‍टरांशी खूप संयमाने चर्चा केली. आणि आपल्या पतीच्या शरीरातील अवयव इतर गरजू रुग्णांना दान केल्यास त्या चौघांचे प्राण वाचणार आहेत, हे ऐकताच त्यांनी पटकन तयारी दर्शविली. माझ्या पतीच्या अवयवांमुळे चौघांचे प्राण वाचत असतील तर त्याहून पुण्याईची दुसरी कोणती गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. आणि मग मात्र नातेवाइकांच्या गळ्यात पडून गदगदून रडू लागल्या. 

अमर पाटील यांच्या पत्नी बारावीपर्यंत शिकल्या आहेत. त्यांना प्रेम व अस्मिता ही दोन मुले आहेत. अमर रंगकामाचा व्यवसाय करायचे. अतिशय कष्टातून त्यांनी व्यवसायाला सुरवात करीत एका चांगल्या टप्प्यावर ते येऊन पोचले होते. सोमवारी (ता. ३०) कामावर जाताना त्यांना अपघात झाला. व ते पुन्हा शुद्धीवर येणार नाहीत, अशा गंभीर अवस्थेत (ब्रेन डेड) जखमी झाले. 

अर्थात आजार कितीही गंभीर असला तरी आपली पती बरा होईल, या आशेवर मयूरी होत्याच; पण काल डॉक्‍टरांनी नातेवाईकांना नेमकी परिस्थिती समजावून सांगितली. मयूरी यांना तसे सांगण्यास कोणाचेही धाडस झाले नाही. मात्र, आज सकाळी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसमोर डॉक्‍टरांनी परिस्थिती सांगितली. खूप तणावपूर्ण अशा वातावरणात मयूरी डॉक्‍टरांचे शब्द ऐकत राहिल्या. आपला पती आता या स्थितीतून बरा होऊ शकत नाही, याचा अंदाज त्यांना आला. व त्यांनी दाटलेल्या अंत:करणाने आपल्या पतीच्या शरीरातील अवयव काढून घेण्यास डॉक्‍टरांना संमती दिली. 

‘‘माझे पती मरण पावले, हे खरे आहे; पण त्यांचे हृदय, मूत्रपिंड, यकृत हे अवयव इतर रुग्णांना देणार असल्याने ते जिवंतच आहेत, असे मी मानते. माझा पती खूप मोठ्या मनाचा होता. अपघातात मरण पावल्यानंतरही तो इतरांना नवे जीवन देऊन गेला. मला या परिस्थितीत शासनाने थोडा हातभार लावावा. मी माझ्या पायावर उभी राहणार आहे.’’ 
- मयूरी पाटील

Web Title: amar patil mayuri patil heart donate motivation