माऊलीची माया होता माझा भीमराया...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सोलापूर - तुझी याद येता मनी कंठ दाटे, तुझ्याविना जग हे सारे सुने वाटे.., चंदनाची छाया, कापराया काया, माऊलीची माया होता माझा भीमराया... यासह अनेक भीमगीतांचे सादरीकरण, मेणबत्ती प्रज्वलित करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले लाखो अनुयायी, महापुरुषांच्या जीवनचरित्रांसह विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री, बाबासाहेबांना आगळीवेगळी आदरांजली म्हणून रक्तदान करणारे कार्यकर्ते.. अशा वातावरणात बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन मंगळवारी पार पडला.

महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह बुधवार पेठ परिसरातील प्रेरणाभूमी येथे लाखो अनुयायांनी भेट देऊन बाबांना अभिवादन केले. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चौकात गर्दी होती. सकाळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कलाकार समितीच्या वतीने सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत चौकात भीमगीत आदरांजली हा कार्यक्रम आयोजिला होता. या पिंपळाच्या पारावरी त्या ज्ञानाच्या जोरावरी माझा भीम सखा भाषण करी..यासह अनेक गाणी या वेळी सादर करण्यात आली. यात विजय सरतापे, कृष्णा माने, सुप्रिया माने, लक्ष्मी बोरकडे, संजय बाबरे, पांडुरंग निकंबे, किशोर शिंदे, डॅनी बाबरे, रमेश जेटीथोर, नंदा गायकवाड, तानसेन लोकरे, अशोक जानराव आदी गायकांसह वादक बाळू सरवदे, बजरंग भोसले आदींनी सहभाग नोंदविला.
तसेच विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कलाकार समितीच्या वतीनेही पंकज शिंदे, रमेश माळशिकारे यांच्यासह इतर कलाकारांनी गीतांचे सादरीकरण केले. चौकात पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर गर्दी होती.

भीमशक्ती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत शंभराहून अधिक सोलापूरकरांनी रक्तदान करून बाबासाहेबांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली. संस्थेचे अध्यक्ष अविनाश इंगळे, सुधाकर सोनवणे, मयूर सोनवणे, बुद्धभूषण इंगळे, प्रीतम भालशंकर, सुबोध वाघमारे आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

इच्छुकांची झाली गर्दी
महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या गर्दीत सर्वच पक्षांच्या राजकीय मंडळींचा वावरही दिसून आला. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले काही उमेदवार दिवसभर परिसरात थांबून होते. काहींनी कार्यकर्त्यांसोबत येऊन शक्तिप्रदर्शनही करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Ambedkar Mahapariniwan din