आंबेडकर स्टेडियमसमोरच्या भूखंड मंदिराला आंदण? 

आंबेडकर स्टेडियमसमोरच्या भूखंड मंदिराला आंदण? 

सांगली - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोरील सुमारे दहा गुंठ्यांच्या भूखंड मंदिराच्या बांधकामासाठी महापालिकेने आंदण देऊन टाकला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा गैरअर्थ काढत कोट्यवधींची पालिकेची मिळकत धार्मिक कारणांसाठी देताना भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षततेच्या तत्त्वालाच तिलांजली दिली आहे. मुळात या भूखंडावर काही वर्षांपूर्वी अनधिकृतपणे गणेश मंदिर उभारून ही जागा बळकावण्याचा घाट घातला होता. 

याबाबतची अधिक माहिती अशी, की सांगली अर्बन बॅंकेच्या प्रवेशद्वारावरील ही मिळकत महापालिकेच्या मालकीची आहे. शेजारचीच वि. स. खांडेकर वाचनालयाची जागा बीओटी प्रस्तावाच्या नावाखाली याच कारभाऱ्यांनी यापूर्वी गिळंकृत केली आहे. आता उरला सुरल्या शेजारच्या किमान दहा कोटींच्या भूखंडावर आता पाणी सोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून इथे पक्के बांधकाम सुरू आहे. याधी गणेश मंदिराचे शेड उभे केले होते. तिथे लागूनच हा प्रकार सुरू आहे. 

याबाबत मालमत्ता अधिकारी रमेश वाघमारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ""येथील रस्त्यावरील नागोबा मंदिराचे स्थलांतर या जागेवर करावे, असा ठराव सभागृहाने केल्याचे समजते. तथापि नेमका ठराव काय झाला, याची माहिती नाही.'' 

दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेतली असता, उच्च न्यायालयाने राज्यभरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे करणार काय, असा सवाल स्थानिक स्वराज्य संस्थांना केला होता. महापालिका क्षेत्रात किमान दोनशेंवर अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. इथल्या नागोबा मंदिराचे सारे धार्मिक कार्यक्रम रस्त्यावरच सुरु असतात. हे मंदिर लगतच्या महापालिकेच्या भूखंडावर स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव पालिकेकडे सादर झाला. या एकमेव प्रस्तावाचा ठराव सभागृहात संमत झाला. या ठरावाला तत्कालीन आयुक्त अजिज कारचे यांनी जाता जाता स्वाक्षरी करून मान्यताही दिली. या ठरावाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. 

वस्तुतः स्थलांतर करायचे झाले, तर ते मंदिराच्या विश्‍वस्तांनी खासगी जागेत करायचे आहे. महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक जागांवर नव्हे. या जागा महापालिने सर्व धर्मीयांसाठी व्यापक सार्वजनिक हितासाठी वापरल्या पाहिजेत. दुर्दैवाने याचे भान ना या शहरातील नागरिकांना उरले आहे की कारभाऱ्यांना. गल्लोगल्ली धार्मिकस्थळांच्या नावाखाली जागा हडपल्या जात आहेत. यावरच्या तक्रारींची दखल घ्यायच्या मनःस्थितीत कोणी नाही. परिणामी भविष्यात नागरी वापरासाठी या शहरात एखादी जागाही उरणार नाही, असं सध्याचे वास्तव आहे. 

""नागोबा मंदिराच्या विश्‍वस्तांनी रस्त्यावरचे मंदिर कडेला हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी माझ्याकडे विचारणा केले होती, मात्र असे पक्के बांधकाम करण्याची मुभा महापालिकेच्या जागेत देता येणार नाही. याबाबत मी तातडीने चौकशीचे आदेश देऊन आपल्याकडे खुलासा करेन.'' 
रवींद्र खेबूडकर,  आयुक्त, सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com