रुग्णवाहिकांची चाके चालकांअभावी जागेवर! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

""रुग्णकल्याण निधीतून काही औषधांची खरेदी करावी लागते. शिवाय हा निधी खर्च करताना काही मर्यादा असल्याने रुग्णवाहिकेच्या चालकाला पगार देता येत नाही.'' 

- डॉ. एस. आर. पाटील, निवासी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, गोंदवले खुर्द. 

गोंदवले - जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांतील रुग्णवाहिकांच्या तात्पुरत्या चालकांचे टेंडर न काढल्याने रुग्णवाहिकांची चाके जागेवर थांबल्याने गंभीर रुग्णांचे जीव वाचविणे आता रामभरोसे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे. 

ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ, अत्यल्प दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयांची उपलब्धता करून दिली आहे. या रुग्णालयांमुळे विशेष करून ग्रामीण भागातील रुग्णांना चांगला फायदाही होत आहे. गंभीर व अतिगंभीर रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळावेत म्हणून प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यावर कायमस्वरूपी चालकांचीही नेमणूक करण्यात आली. मात्र, ज्या ठिकाणी कायमस्वरूपी चालक नाहीत, तिथे टेंडर पद्धतीने चालकांची नियुक्ती करण्यात येते. या ठेकेदार चालकांबाबतचे सर्व निर्णय आरोग्य उपसंचालकांना देण्यात आलेले आहेत. जेथे कायमस्वरूपी रुग्णवाहिका चालक नाहीत अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात चालक नेमावेत, असे आदेशदेखील या कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत. त्यासाठी कोल्हापूर येथील डी. एम. इंटरप्रायजेस या कंपनीने टेंडर भरले होते. त्यांच्या टेंडरची मुदत गतवर्षीच्या एप्रिल महिन्यातच संपली आहे. त्यानंतर मात्र, टेंडरच काढण्यात आलेले नाही. परिणामी कायमस्वरूपी चालक नसणाऱ्या रुग्णालयांतील रुग्णवाहिकांची चाके चालकांअभावी थांबल्याचे चित्र आहे. वर्षभरापासून जिल्ह्यामधील अनेक ग्रामीण रुग्णालयांत अशीच अवस्था आहे. 

रुग्णवाहिका धूळखात 

गोंदवले खुर्द (ता. माण) येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन्ही रुग्णवाहिका वर्षभरापासून धूळखात उभ्या आहेत. या दोनपैकी एक निकामी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी दुसरी रुग्णवाहिका सुस्थितीमध्ये असूनही चालकाअभावी जागेवर उभी आहे. रुग्णांची गंभीरता लक्षात घेवून तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिकेची नेहमी गरज भासते. मात्र, चालकांअभावी रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण बनत आहे. अनेकदा अति तातडीची 108 ही रुग्णवाहिका बोलविणे भाग पडते. मात्र, बऱ्याचदा ही रुग्णवाहिका इतर ठिकाणच्या रुग्णसेवेत व्यस्त राहत असल्याने ग्रामीण रुग्णालयांतील रुग्णांची फरफट होताना दिसते. तातडीच्या रुग्णांच्या सेवेबरोबरच रुग्णालयात लागणारी औषधे व इतर साधने ने-आण करण्यासाठी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठकींना उपस्थित राहण्यासाठी तसेच खासगी दवाखान्यांच्या तपासणीसाठी, गरोदर महिलांना रुग्णालयात आणणे व प्रसूतीनंतर घरी सोडण्यासाठी या रुग्णवाहिकांचाच उपयोग होतो. परंतु, चालकांअभावी गेल्या वर्षभरापासून  या सर्वच कामांसाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यात रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक व आर्थिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. रुग्णवाहिका चालक नियुक्तीबाबत अनेकदा वरिष्ठांकडे पाठपुरावादेखील करण्यात आला आहे. मात्र, यावर तोडगाच निघत नसल्याने या रुग्णवाहिका सलाईनवरच आहेत. 

Web Title: ambulance drivers issue