Vidhan Sabha 2019 : शरद पवारांनी पंधरा वर्षातील सत्तेचा हिशेब द्यावा : अमित शहा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

देशात दहा वर्षे आघाडीची आणि राज्यात पंधरा वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. या काळात तुम्ही काय केले, याचा हिशेब शरद पवार यांनी आधी द्यावा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे दिले. 

जत (सांगली) : देशात दहा वर्षे आघाडीची आणि राज्यात पंधरा वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. या काळात तुम्ही काय केले, याचा हिशेब शरद पवार यांनी आधी द्यावा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे दिले. 

भाजपचे जत विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप उपस्थित होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष परिवारवादात अडकेलेले आहेत. त्यांच्या काळात महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात घसरण झाल्याची तोफ त्यांनी डागली. 

ते म्हणाले, "त्यांच्या पंधरा वर्षाच्या सत्ता काळात व्यापार, उद्योग, कृषी, अर्थ, सिंचन, दुग्ध व्यवसायात महाराष्ट्राची मोठी घसरण झाली आहे. या जनतेसमोर प्रचाराला येताना त्यांनी आधी त्याचा हिशेब दिला पाहिजे. गेल्या वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणले आहे. महाराष्ट्राचा दबदबा वाढला आहे. कॉंग्रेसच्या काळात दिल्लीतून सारखे मुख्यमंत्री बदलले जात होते. सरकार स्थिरपणे काम करत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना बळ दिले, पाच वर्षे ताकद दिली आणि आज फरक दिसतोय.'' 

जत सीमा भागाला कर्नाटकातून पाणी देणार 
​दुष्काळी जत तालुक्‍याच्या सीमावर्ती भागाला कर्नाटकातून पाणी देण्याची योजना लवकरच होईल. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कनार्टकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे, अशी खात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप उपस्थित होते. 

जत येथे भाजप उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. जत तालुक्‍यातील सीमावर्ती 42 गावांना कर्नाटकातील हिरेपडसलगी योजनेतून पाणी देण्याचा विषय चर्चेत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमधील समन्वयाअभावी गेल्या काही वर्षांपासून ही विषय पुढे गेलेला नाही. त्या मुद्याला शहा यांनी हात घातला. 

ते म्हणाले, "सांगलीच्या जनतेने आम्हाला ताकद दिली आहे. आम्ही तुमचे प्रश्‍न सोडवणार आहोत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची 4 हजर 960 कोटींची सुधारित मान्यता आम्ही दिली आहे. आता कर्नाटकातून पाणी देण्याचा विषयही लवकरच मार्गी लागेल.'' 

सांगली जिल्ह्याच्या विकासाबाबत ते म्हणाले, "इस्लामपूरला टेक्‍सटाईल पार्क, सांगलीत बसपोर्ट, कवठेमहांकाळला ड्रायपोर्ट असा विकासाचा धडाका आम्ही लावला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये देऊन मोदींनी तुमच्या कष्टाला हातभार लावला आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah was speaking at a rally organized by BJP Jat Vidhan Sabha