चार लोकसभा मतदारसंघांचा अमित शहा घेणार आढावा

चार लोकसभा मतदारसंघांचा अमित शहा घेणार आढावा

सांगली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांगली दौऱ्यात चार लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम मैदानावर पुढील आठवड्यात गुरुवारी (ता.२४) मेळावा होणार असून त्याच्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे.

तासगाव येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत २४ जानेवारीस होणार  आहे. कार्यक्रमासाठी दोन्ही नेते सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशीच सांगलीसह हातकणंगले, कोल्हापूर आणि सातारा या चार लोकसभा मतदार संघांचा आढावा शहा घेणार आहेत. त्यासाठी या चार मतदार संघांतील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे.

नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम मैदानावर दुपारी मेळावा होणार आहे. यामध्ये तीनही जिल्ह्यांतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा सरचिटणीस, मंडल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख,  बूथप्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सांगली भाजपतर्फे नियोजन सुरू आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नारा दिला. त्यामुळे या चार मतदार संघांतील निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी शहा येत आहेत. दौऱ्याच्या नियोजनासाठी आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत सांगली विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

शक्तिप्रदर्शनाची तयारी
निवडणुकीच्या जय्यत तयारीसाठी बूथ ताकदवर  करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ असा प्रोत्साहनवजा नारा दिला आहे.  तसेच पाच बूथला एक प्रमुख नेमला असून त्याला शक्तिकेंद्र प्रमुख असे संबोधण्यात येत आहे. त्यांना बूथची माहिती घेऊन त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची सूचना दिली आहे. शहा या मेळाव्यात तयारीचा आढावा घेताना अगदी बूथ प्रमुख, तालुका प्रमुख यांच्याकडूनही  माहिती घेण्याची शक्‍यता आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने भाजप पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीला लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com