दारूगोळा जप्त प्रकरणः कर्नाटकसह पुणे, मुंबईवर नजर 

दारूगोळा जप्त प्रकरणः कर्नाटकसह पुणे, मुंबईवर नजर 

कोल्हापूर - राज्यातील महानगरांमध्ये घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयितांना पकडल्यानंतर एटीएस आणि एसआयटीने संयुक्त तपास सुरू केला आहे. तीन वेगवेगळी पथके कर्नाटकसह पुणे, मुंबईवर नजर ठेवून आहे. यातून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांकडून समजते.

एटीएसने मुंबईत १० ऑगस्टला तिघा संशयितांना अटक केली होती. अटक केलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्याकडून २० गावठी बॉम्ब, जिलेटिनच्या दोन कांड्या, २२ नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर्स, विषाच्या दोन बाटल्यांसह बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले होते.

प्राथमिक चौकशीत यातील कळसकरचे कोल्हापुरात वास्तव्य होते. तो चार वर्षे टर्नरचे प्रशिक्षण व काम करण्यासाठी कोल्हापुरात होता, ही बाब पुढे आली. याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्याचबरोबर एसआयटीचे एक पथकही कोल्हापुरात दाखल झाले आहे. दोन्ही पथकांचा संयुक्त तपास सुरू आहे. कळसकर कोठे राहत होता? कोठे काम करत होता? त्यावेळी तो कोणता मोबाईल वापरत होता? त्याने मोबाईल वापरणे कधी बंद केले? त्याच्या कॉल डिटेल्स्‌वरून त्याच्या संपर्कात कोण कोण होते? त्यांचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का? आदी माहिती या दोन्ही पथकांकडून संकलित केली जात असल्याचे समजते. 

दरम्यान, या दोन्ही पथकांकडून सध्या संयुक्त तपास सुरू आहे. त्यांची तीन वेगवेगळी पथके मुंबई, पुण्यासह कर्नाटकातही गेली आहेत. कर्नाटक पोलिसांकडून डॉ. कलबुर्गी हत्येचा तपास गतीने सुरू आहे. त्यांनी अटक केलेल्या संशयितांकडे याबाबत चौकशी केली जात आहे. तसेच कळसकरची संयुक्त पथकाकडून पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गोपनीयरित्या चौकशी केली जात आहे. त्यामुळे चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांकडून समजते. 

कोल्हापुरात मे महिन्यात शिबिराच्या सांगतेवेळी सशस्त्र संचलन केले होते. त्या संचलनाबाबतही तपास यंत्रणेकडून माहिती घेतली जात आहे. दरम्यान, शहरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शहरातील पोलिस उपअधीक्षकासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्याकडून कळसकरचे कोल्हापूर कनेक्‍शन शोधण्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य एटीएस व एसआयटीला करावे, अशा सूचनाही त्यांच्याकडून पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. 

सिंघल यांच्या नेतृत्वाखाली तपास
एटीएसचे प्रमुख संजय कुमार यांची बदली नवी मुंबईचे पोलिस आयुक्त पदावर झाली असून, त्यांचा पद्‌भार आता सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक संजीव सिंघल यांच्याकडे गेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त यंत्रणेचा तपास सुरू असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com