दारूगोळा जप्‍त प्रकरण: कळसकरचे कोल्हापुरात होते वास्तव्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी मुंबईत एटीएस पथकाने अटक केलेल्या संशयित शरद भाऊसाहेब कळसकरचे कोल्हापूर कनेक्‍शन समोर आले आहे. त्याने कोल्हापुरात टर्नरचे प्रशिक्षण घेऊन कामही केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

कोल्हापूर - घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी मुंबईत एटीएस पथकाने अटक केलेल्या संशयित शरद भाऊसाहेब कळसकरचे कोल्हापूर कनेक्‍शन समोर आले आहे. त्याने कोल्हापुरात टर्नरचे प्रशिक्षण घेऊन कामही केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. यासंबंधी वरिष्ठ पोलिस अधिकारी, एसआयटी पथक आणि एटीएस पथकातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यांच्याकडून यासंबंधीचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

राज्यातील प्रमुख महानगरामध्ये घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या वेगवेगळ्या संघटनेच्या तीन सदस्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)ने काल अटक केली. त्यामध्ये संशयित वैभव सुभाष राऊत, सुधन्वा सुधीर गोंधळेकर आणि कळसकरचा समावेश आहे. राऊतकडून २० गावठी बॉम्ब, जिलेटिनच्या दोन कांड्या, २२ नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर्स, विषाच्या दोन बाटल्यांसह बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली होती. चौकशीत कळसकरने कोल्हापुरात टर्नर (लेथ मशिनवरील काम)चे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने काहीकाळ लेथ मशिनवर कामही केले. 

त्यासाठी तो सुमारे चार वर्षे कोल्हापुरात होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्याने कोठे प्रशिक्षण घेतले, तो कोठे काम करत होता, कोठे रहात होता, तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला भेटण्यासाठी वैभव आणि सुधन्वा कोल्हापुरात येत होते का आदींची माहिती घेण्याचे काम तपास यंत्रणेकडून सुरू झाल्याचे समजते. 

Web Title: Ammunition seized case Kalaskar residence in Kolhapur