सायबर सेलमुळे फसवणूक झालेली रक्कम मिळाली परत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

रेड्डी यांनी विश्‍वास ठेवून ओटीपी क्रमांक सांगितला. त्यानंतर रेड्डी यांच्या बॅंक खात्यावरून 39 हजार 939 रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांच्या मोबाईलवर एसएमएस आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेड्डी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 

सोलापूर : ऑनलाईन फसवणुकीमध्ये ट्रान्सफर झालेल्या रक्कमेपैकी पंचवीस हजारांची रक्कम सायबर पोलिस ठाण्यातील पथकाच्या प्रयत्नामुळे परत मिळाली. बाळाप्पा विठोबा रेड्डी (रा. बालाजी सोसायटी, मुक्ता बंगलोज, कुमठा नाका, सोलापूर) यांनी पोलिस आयुक्त महादेव तांबडे आणि सायबर पोलिसांची भेट घेऊन आभार मानले. 

रेड्डी यांना 5 जुलै 2018 रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास फोन आला होता. मी बॅंक मॅनेजर बोलतोय, तुमचे क्रेडीट कार्ड व्हेरीफिकेशन करायचे आहे, असे सांगून समोरच्या व्यक्तीने पासवर्ड व कार्डची इतर माहिती विचारली होती. मोबाईलवर आलेला ओटीपीही जाणून घेतला. 

रेड्डी यांनी विश्‍वास ठेवून ओटीपी क्रमांक सांगितला. त्यानंतर रेड्डी यांच्या बॅंक खात्यावरून 39 हजार 939 रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांच्या मोबाईलवर एसएमएस आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेड्डी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 

रेड्डी यांच्या बॅंक खात्यावरून एमपैसा वॉलेट, फोन पे वॉलेट आणि सीसीअवेन्यू वॉलेट यावर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याकडून तत्काळ संबंधित कंपन्यांना ईमेल पाठविण्यात आले. रेड्डी यांची फसवणूक करून पैसे ट्रान्सफर केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी तत्काळ ती रक्कम थांबविली आणि अर्जदाराच्या खात्यावर 25 हजार 815 रुपये जमा केले. 

रेड्डी यांनी पोलिस आयुक्त महादेव तांबडे आणि सायबर पोलिस ठाण्यातील पथकाची भेट घेऊन आभार मानले. गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर, पोलिस कर्मचारी अमोल कानडे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. 

ओटीपी कधीही कोणाला सांगू नका 

बॅंकेतून किंवा अन्य ठिकाणांहून बोलतोय असे सांगून ओटीपी विचारल्या देवू नका. बाळाप्पा रेड्डी यांच्याप्रमाणेच तुमची फसवणूक झाली असेल तर पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी 0217-2744616 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Amount back Because of cyber cell