प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची मात्रा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

निरी, आयआयटी संयुक्तपणे काम करणार - वाहनांची वाढती संख्या कोल्हापूरच्या मुळावर

निरी, आयआयटी संयुक्तपणे काम करणार - वाहनांची वाढती संख्या कोल्हापूरच्या मुळावर
कोल्हापूर - शहरातील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण संस्था (निरी) व आयआयटी पवई (मुंबई) संयुक्तपणे काम करणार आहे. 1 कोटी 70 लाखांच्या निधीतून कोल्हापूरसह अन्य दहा शहरांतील प्रदूषण रोखण्यासाठी उपायोजना होणार आहेत. नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यव्यापी कार्यशाळेत यासंबंधी आढावा घेतला.

वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे प्रदूषण कोल्हापूरच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यादीत हवेचे प्रदूषण असलेले शहर म्हणून कोल्हापूरचा समावेश झाला आहे. धोक्‍याच्या पातळीपर्यंत प्रदूषणाची व्याप्ती गेली असून सीमारेषा ओलांडली जाऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जाणाऱ्या आहेत. मुंबईसह, पुणे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, यवतमाळ या शहरांचा यात समावेश आहे. आयआयटी पवई (मुंबई) आणि राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था (निरी) या कामी संयुक्तपणे काम करणार आहेत.

दुचाकी असो अथवा चारचाकी दरवर्षी वाहनांच्या संख्येत लाखाने भर पडत आहे. जिल्ह्यात संख्या बारा लाखांवर गेली आहे. धूर ओकणाऱ्या वाहनांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. अरुंद आणि अपुरे रस्ते, त्यात सिग्नलला वाहने थांबली की बाहेर पडणारा काळाकुट्ट धूर यामुळे प्रदूषणाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाकडून राज्यातील प्रमुख शहरांच्या हवेच्या प्रदूषणासंबंधी प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर कोल्हापूरसह अन्य दहा शहरांच्या हवेच्या प्रदूषणासंबंधी येत्या सहा महिन्यांत उपाययोजना करून नंतर अंमलबजावणी केली जाईल, असे उत्तर देण्यात आले.

नागपूर येथे बुधवारी (ता. 19) आणि गुरुवारी राज्यव्यापी कार्यशाळा झाली. महापालिकेचे आर. के. पाटील व शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत सहभागी झाले. हवेचे प्रदूषण धोक्‍याच्या पातळीजवळ आहे, कोल्हापूरच्या प्रदूषणासंबंधी प्रमुख कारण वाहनांची वाढती संख्या हे आहे. गेल्या पाच- सात वर्षांपासून वाहनांची वाढती संख्या पाहता हवेच्या प्रदूषणाच्या एक ना एक दिवस गंभीर प्रश्‍न निर्माण होणार हे निश्‍चित होते. सुमारे साडेसहा लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरात वाहनांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरला आहे.

हे केले जाणार
पहिल्या टप्प्यात प्रदूषणाचे मापदंड जाणून घेणे, प्रदूषणकारी मुख्य घटक, काही वर्षांत प्रदूषणामुळे आरोग्याचे काही प्रश्‍न निर्माण झाले का? त्यासंबंधी आकडेवारी जमा केली जाणार आहे. उंच इमारतींच्या बांधकामा वेळी ताडपत्री लावता येईल का, वृक्षारोपण, वाहतूक एका जागेवर न थांबता तीत सातत्य कसे राहील, विकास आराखड्यात औद्योगिक वसाहतीचे विभाग पाडणे, असे उपाय केले जाणार आहेत.

Web Title: Amount of measures to prevent pollution