नेत्यांना धक्का नव्हे तर 'दणकाच' 

सुधाकर काशीद
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर:  हे गाव आम्हा दोघा भावांचं, हे गाव ताई आणि साहेबांचं, हे गाव फक्त आमच्या गॅंगचं, गावात आमच्या पुढे कोण जात नाही आणि आम्ही गावात दुसऱ्या कोणाला सत्ता देत नाही... अशा भ्रमात असलेल्यांना, कोणाला सत्ता देत नाही अशा भ्रमात असलेल्यांना जनतेने एका झटक्‍यात जमिनीवर आणले आहे.

कोल्हापूर:  हे गाव आम्हा दोघा भावांचं, हे गाव ताई आणि साहेबांचं, हे गाव फक्त आमच्या गॅंगचं, गावात आमच्या पुढे कोण जात नाही आणि आम्ही गावात दुसऱ्या कोणाला सत्ता देत नाही... अशा भ्रमात असलेल्यांना, कोणाला सत्ता देत नाही अशा भ्रमात असलेल्यांना जनतेने एका झटक्‍यात जमिनीवर आणले आहे.

जिल्ह्यात अमुक एक गाव किंवा अमुक एक नगरपालिका म्हणजे त्यावर ठराविकांचाच सात-बारा उतारा असा खासगीत नव्हे तर उघड रुबाब करणाऱ्यांना चारीमुंड्या चीत केले आहे. पाचशे-हजारची नोट, जेवणाचे ताट, आणि एक दिवसाची सहल एवढ्या भांडवलावर सत्ता ताब्यात ठेवू, अशा समजुतीत असलेल्या नेत्यांनाच जनतेने सुटीवर पाठवले आहे. जिल्ह्यातल्या नगर परिषदेत जनतेने दिलेला हा कौल व प्रस्थापित नेत्यांना केवळ धक्का नव्हे तर दणका देणारा ठरणार आहे. 

या निवडणुकीत कोणत्या पक्षाला, कोणत्या आघाडीला धक्का बसला, कोणत्या पक्षाला, आघाडीला मुसंडी मारता आली हा जरूर राजकारणातल्या घडामोडीचा एक भाग आहे. पण वैयक्तिक नको इतकी महत्त्वाकांक्षा व पैशाच्या जोरावर गाव आपल्या पाठीशी आणू शकतो, असे मानणाऱ्या वृत्तीला कसा झटका बसू शकतो याचे ही निवडणूक एक उदाहरण ठरली आहे. जयसिंगपूर, वडगाव, मुरगूड, कागल, पन्हाळा, मलकापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड इथला निकाल नेमके हेच सांगतो आहे. इथल्या प्रस्थापितांनी जनता आपल्या सोबत आहे, आपल्याला सोडून कोठे जाऊ शकत नाही हे गृहीतच धरून ते निवडणुकीत उतरले. प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्याला फारशी टक्कर देऊ शकणार नाहीत या समजुतीत राहिले. भव्य प्रचार फेऱ्या, भव्य सभा, प्रचार फेरीत 'गर्दीचे' दर्शन, हायटेक तंत्र आणि कळत-नकळत आपला दबदबा कायम ठेवत प्रचाराची यंत्रणा राबवत राहिले. त्यांच्या जवळपासचे काही लोक ही गल्ली पॅक, ती गल्ली पॅक, हे मंडळ आपले, ते मंडळ आपले असल्या चर्चेत गुंग राहिले. सर्वसामान्य मतदाराच्या मनात काय आहे हे जाणून न घेताच प्रचार यंत्रणा राबवत राहिले. काही जण शेवटच्या दोन दिवसांत 'चमत्कार' घडवण्याच्या तयारीला लागले. 

पण जनतेने अशा लोकांना पूर्णपणे नाकारले. त्याला कारण एकच. काही नेते 'मी'पणाच्या कोषातून बाहेर पडले नाहीत. काही जणांनी आपल्या घरातल्यांनाच उमेदवारी दिली. आपल्या घराण्याशिवाय दुसऱ्या कोणी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक व्हायचेच नाही, अशीच अलिखित भाषा त्यांनी प्रचाराच्या काळात वापरली. नोकरी घालवण्याची गर्भित धमकी देत काही ठिकाणी मतांची जुळणी केली गेली. सर्वधर्मसमभाव हे जाहीर भाषणात सहज म्हणणाऱ्यांनीही जाती-धर्माच्या एकगठ्ठा मतासाठी फिल्डिंग लावली. 

पण लोकांनी या वेळी न बोलता आपल्या मताची ताकद दाखवली. मला तो चांगला उमेदवार वाटतो, त्याला मी मत देणार, ही भूमिका बऱ्यापैकी घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी एका पक्षाला, नगरसेवकपदासाठी दुसऱ्या पक्षाला मतदान करण्याची मनापासून संधी घेतली. कोणी कितीही दडपण आणू देत, आपल्याला हवे त्यालाच मतदान करण्याची संधी घेतली व स्वतःला भले भले समजणाऱ्यांनाही निवडणूक निकालानंतर घराची दारे बंद करून बसण्याची वेळ जनतेने आणली. 

मतदारांची चपराक 
पाचशे, हजारची नोट या निवडणुकीत ताकदीने वापरता आली नाही. पण काही आघाडीप्रमुखांनी मतदारांवर खैरात ठेवली. चतुर मतदारांनी ही खैरात घेतली. पण मते दुसऱ्यालाच दिली. गावतंय तर सोडायचं नाही, ही काही मतदारांची भूमिका जरूर चुकीची ठरली. पण पैशाच्या केवळ बळावर निवडणूक लढवणाऱ्यांना चपराक देणारीही ठरली.

Web Title: Analysis of Municipal elections in Kolhapur