अन आईने फाेडला हंबरडा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

पटांगणात खेळत असलेल्या दोन्ही मुलांना बोलवण्यासाठी आई गेली असता त्यांना मुले दिसली नाहीत. शाेधाशाेध घेतल्यानंतर खाणीतील पाण्यात भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

मलकापूर (जि. सातारा) ः  नांदलापूर (ता. कऱ्हाड) येथील खाणीमध्ये दोन सख्या भावांचे मृतदेह आज आढळून आले. खाणीमध्ये पोहताना पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. उदय अशोक मुनेकर (वय 7) व हनुमंत अशोक मुनेकर (वय 9, दोघेही रा. धनगरवाडी, नांदलापूर ता. कऱ्हाड) अशी मृतांची नावे आहेत. काल (ता. 9) दुपारपासून हे दोघे गायब होते.
 
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती ः अशोक मुनेकर (मूळ रा. कोरवार, ता. शिंदी, जि. विजापूर व सध्या रा. धनगरवाडी- नांदलापूर, ता. कऱ्हाड) हे पत्नी भूमिका, तीन मुले हनुमंत, उदय व मनोज यांच्यासमवेत वास्तव्यास आहेत. नांदलापुरातील धनगरवाडीत 12 वर्षांपासून ते भाडेतत्त्वावर घरात राहतात. अशोक हे मिळेल तेथे बिगारी काम करतात, तर पत्नी भूमिका या हॉटेलमध्ये कामाला जातात. नेहमीप्रमाणे अशोक व भूमिका हे काल साडेअकरा वाजता कामावर जाण्यासाठी निघाले.

त्या वेळी हनुमंत व उदय हे शेजारच्या पटांगणात खेळत होते. सर्वात लहान मनोजला अंगणवाडीत बसवून त्या हॉटेलमध्ये कामासाठी गेल्या. पत्नीला कामावर सोडून तब्येत बरी नसल्याने अशोक हे कऱ्हाडमध्ये दवाखान्यात गेले. दवाखान्यातून ते घरी जाऊन झोपले. भूमिका या नेहमीप्रमाणे हॉटेलमधील काम आटोपून घरी जाताना त्या अंगणवाडीतून मनोजला घेऊन घरी आल्या. पटांगणात खेळत असलेल्या दोन्ही मुलांना बोलवण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना मुले दिसली नाहीत.

मुलांबाबत शेजारी चौकशी केली असता दोन्ही मुले तेथेच खेळत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुठे गेली माहीत नाही असे शेजारील महिलेने सांगितले. घरात झोपलेल्या पती व हॉटेल मालकाला त्यांनी ही माहिती दिली. हॉटेल मालकासह आई-वडिलांनी मुलांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा पत्ता लागला नाही.

रविवारी दुपारी मुलांना कोणी तरी पळवून नेले असावे, अशी तक्रार भूमिका यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनीही तातडीने शोधकार्य सुरू केले. तपासादरम्यान नांदलापूरच्या हद्दीतच दीड किलोमीटर अंतरावर सरकारी मालकीच्या दगडाच्या खाणीत दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले. त्या दोन्ही भावंडाचे कपडे खाणीशेजारीच असल्यामुळे खेळता-खेळता पोहायला जाऊन पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आसावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिरोळे तपास करत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And Mom Got Fully Depreesed