आंधळी तलाव आटल्याने टंचाईचा धोका

आंधळी (ता. माण) - पुरेशा पावसाअभावी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे.
आंधळी (ता. माण) - पुरेशा पावसाअभावी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे.

गोंदवले - अपुऱ्या पावसामुळे यंदा आंधळी तलाव पूर्णपणे आटला आहे. पाण्यासाठी इतर पर्यायही राहिलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांतच भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने दहिवडीसह गोंदवलेकर ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे.

आंधळी तलावावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून दहिवडी व गोंदवले बुद्रुक ही दोनच गावे सुरवातीपासून कायमस्वरूपी पाणी उचलत आहेत. या योजनेत समाविष्ट असल्याने दोन्ही गावांना टंचाईच्या काळात शासनाकडून टॅंकरही मिळत नाही. त्यामुळे टंचाईच्या काळात दोन्ही गावांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी होते.

परिणामी, आर्थिक कुवत नसतानाही स्थानिक प्रशासनालाच लोकांची तहान भागवण्यासाठी कमालीची धडपड करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी गेल्या दोन-तीन वर्षांत माण तालुक्‍यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पावसाचे पाणी ज्या-त्या भागातच अडवले गेले आहे. माण नदीच्या उगम झालेल्या कुळकजाई, भांडवली, मलवडी भागातही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याने आंधळी तलावात येणारा पाण्याचा स्रोत जागोजागी अडवण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाचे पाणी नदीतून आंधळी तलावात येण्याचे मार्ग जवळपास बंदच झाले आहेत. या परिसरात मोठा पाऊस होऊन आंधळीच्या पश्‍चिमेकडील येणारे सर्व पाणीसाठे भरून वाहिल्याखेरीज तलावात पाणी येणे मुश्‍किल बनले आहे. यंदा या भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने तलावातील पाण्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे. तरीही गरज म्हणून तलावातील मृत साठ्यातूनच गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीसाठाही अगदी अल्पकाळच टिकणार असल्याने भविष्यात दहिवडी व गोंदवल्याला मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. आगामी काळात जिहे- कटापूर योजना पूर्ण होईपर्यंत आंधळी तलावात पुरेसे पाणी उपलब्ध होण्याची शक्‍यता धुसरच आहे. त्यामुळे या दोन्ही गावांना पाण्यासाठी आता इतर पर्याय शोधावेच लागणार आहेत.

उरमोडी योजनेचे पाणी पिंगळी तलावात सोडल्यास या दोन्ही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास चांगली मदत होईल. त्यामुळे पोटकालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पिंगळी तलावात पाणी सोडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पिंगळी तलावाजवळ विहीर घेऊन गोंदवल्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संजय माने, उपसरपंच, गोंदवले बुद्रुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com